भिवंडी : गर्लफ्रेंडवर इम्प्रेशन मारण्यासाठी तसेच तिला फिरवण्यासाठी चोरीचा मार्ग पत्कारून एका चोरट्याने साथीदारांच्या मदतीने तब्बल 28 महागड्या दुचाक्या लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या चोरट्याला त्याच्या साथीदारासह कोनगाव पोलिसांनी शिताफीने सापळा रचून दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.

शहरात मोटारसायकल चोरीच्या घटनेत वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले होते. विशेष म्हणजे या चोरट्याने भिवंडी, पुणे कर्नाटक राज्यातुन 8 रॉयल एनफिल्ड कंपनीच्या बुलेट लंपास केल्या होत्या. तर अन्य 20 दुचाक्या विविध कंपनीच्या असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मसू उर्फ पिंटू राम मोरे हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील रहिवाशी आहे. तर प्रदीप क्षेत्री असे अटक केलेल्या दुसऱ्या आरोपीचं नाव आहे. या प्रकरणी इतर साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका दुचाकी चोरी प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश काटकर यांच्या मार्गदशनाखाली एपीआय अभिजित पाटील यांच्या पोलीस पथकाला गुप्त माहितीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार मुंबई - नाशिक मार्गावरील सरवली येथील बासुरी हॉटेल समोर चोरटा येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार याठिकाणी सापळा लावून मसू उर्फ पिंटू याला दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता. त्याने मौज मजा आणि गर्लफ्रेंडला विविध दुचाक्यांवर फेरफटका मारून तिला इम्फ्रेस करण्यासाठी 28 दुचाक्या चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.

दरम्यान काही दुचाक्या हा चोरटा कर्नाटकमधील आपल्या नातेवाईकांना 5 ते 10 हजार रुपये किंमतीत विक्री करायचा. पोलिसांनी आतापर्यंत 28 दुचाक्या हस्तगत केल्या असून 11 दुचाक्या बेवारस सोडून दिल्या होत्या. तसेच या गुन्ह्यात अजूनही मोटरसायकली जप्त होण्याची शक्यता आहे. या चोरी प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून दोन ते तीन आरोपी अजूनही फरार आहेत. मात्र त्यांनाही लवकरात लवकर अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.