मुंबई : 2017 हे सरतं वर्ष मराठी साहित्यासाठीही महत्त्वपूर्ण ठरलं. अनेक साहित्यिकांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले, अनेक ठिकाणी वादाची ठिणगी पडली, तर काही साहित्यिक काळाच्या पडद्याआड गेले. मराठी साहित्य संमेलनाच्या ठिकाणाचा वादही गाजला. अशा विविध घटनांनी 2017 हे वर्ष मराठी साहित्यासाठी वेगळं ठरलं.


सरत्या वर्षातील निवडक घटना :

4 जानेवारी 2017 - राज्य शासनाकडून 4 पुरस्कार जाहीर. भारतीय विचार साधना प्रकाशन (श्री. पु. भागवत उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार), ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली (विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार), श्याम जोशी (मंगेश पाडगावकर भाषासंवर्धक पुरस्कार) आणि ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ यास्मिन शेख (डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार) यांना गौरवण्यात आले.

18 जानेवारी 2017 - प्रसिद्ध साहित्यिक प्रा. पुरुषोत्तम श्रीपत पाटील उर्फ 'पुपाजी' यांचं 89 व्या वर्षी धुळ्यात निधन.

3 ते 5 फेब्रुवारी - डोंबिवलीत 90 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं. लेखक अक्षयकुमार काळे हे अध्यक्षपदी होते.

22 मार्च 2017 - ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक गोविंद तळवळकर यांचं वयाच्या 91 व्या वर्षी निधन झालं.

7 मे 2017 - ज्येष्ठ दलित साहित्यिक भीमसेन देठे यांचं वयाच्या 70 व्या वर्षी निधन.

ऑगस्ट 2017 - अभ्यासक्रमातून मोगलांचा इतिहास वगळल्याने मोठा वादंग निर्माण झाला होता. साहित्य क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत होत्या.

सप्टेंबर 2017 - एक हजाराहून अधिक कादंबऱ्या लिहिणारे ज्येष्ठ लेखक गुरुनाथ नाईक हे हालाखीच्या स्थितीत जगत असल्याचे समोर आले आणि सर्वच माध्यमांनी दखल घेत नाईक यांना मदतीसाठी आवाहन केले. त्यानंतर अनेकांनी मदतीचे हात पुढे केले.

2 सप्टेंबर 2017 - आचार्य अत्रेंच्या कन्या आणि मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक शिरीष पै यांचं निधन.

11 सप्टेंबर 2017 - 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुलडाण्यातील मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रमात आयोजित करण्याचे महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी जाहीर केले.

18 सप्टेंबर 2017 - हिवरा आश्रमाच्या ठिकाणावरुन वाद झाला आणि 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ठिकाण बदलण्यात आले. गुजरातमधील बडोदा येथे संमेलन भरवण्याचे महामंडळाकडून जाहीर करण्यात आले. याआधी 1909, 1921 आण 1934 साली बडोद्या साहित्य संमेलन भरवण्यात आले होते. मात्र स्वातंत्र्योत्तर भारतात पहिल्यांदाच बडोद्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवण्यात येणार आहे.

25 सप्टेंबर 2017 - ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आणि मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष अरुण साधू यांचं निधन

2 ऑक्टोबर 2017 - 'मराठी साहित्य संमेलन म्हणजे चोरांची आळंदी', असे म्हणत लेखक मिलिंद बोकील यांनी नव्या वादाला सुरुवात केली. ठाण्यात झालेल्या मॅजेस्टिग गप्पांच्या कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले होते.

2 ऑक्टोबर 2017 - ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे यांचं दीर्घ आजाराने निधन

13 ऑक्टोबर 2017 - ब्रिटिश-जपानी लेखक काजुओ इशिगुरो यांना यंदाचा साहित्याचा नोबल मिळाला.

3 नोव्हेंबर 2017 - हिंदी भाषेतील प्रख्यात लेखिका कृष्णा सोबती यांना यंदाच्या 'ज्ञानपीठ' पुरस्काराने गौरवण्यात आलं.

10 डिसेंबर 2017 - साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांची 91 व्या अखिल भारतीय साहित्य संमलेनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यांनी डॉ. किशोर सानप, डॉ. रवींद्र शोभणे, रवींद्र गुर्जर आणि राजन खान यांचा पराभव केला.

20 डिसेंबर 2017 - ज्येष्ठ वन्यजीवतज्ज्ञ आणि माजी संमेलनाध्यक्ष मारुती चितमपल्ली यांना किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

21 डिसेंबर 2017 - प्रसिद्ध मराठी कवी श्रीकांत देशमुख यांच्या 'बोलावे ते आम्ही...' या कवितासंग्रहाला यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. त्याचबरोबर, सुजाता देशमुखय यांच्या 'गौहर जान म्हणतात मला' या अनुवादित पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा उत्कृष्ट अनुवादाचा पुरस्कार जाहीर झाला.

22 डिसेंबर 2017 - महाराष्ट्र फाऊंडेशनच्या पुरस्कारांची घोषणा. लेखक अनिल अवचट यांना साहित्य जीवनगौरव, सई परांजपे यांच्या 'सय : माझा कलाप्रवास' या पुस्तकाला अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार, कल्पना दुधाळ यांच्या 'धग असतेच आसपास' या काव्यसंग्रहाला ललित ग्रंथ पुरस्कार, अजित दळवी यांना 'समाजस्वास्थ्य' या नाटकाच्या लेखनासाठी रा. शं. दातार नाट्यपुरस्कार जाहीर

24 आणि 25 डिसेंबर 2017 - ग्रंथाली प्रकाशनाचा 43 वा वाचक दिन मुंबईतील दादरच्या किर्ती महाविद्यालयाच्या प्रांगणात साजरा झाला. यात अनेक पुस्तकांचे प्रकाशन आणि चर्चासत्रेही पार पडली.

25 डिसेंबर 2017 - ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून साकारलेलं 'अशेही एक साहित्य संमेलन' दादरमध्ये पार पडलं. या संमलेनच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक अरुण शेवते होते.