युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंच्या पुढाकारातून रुफ टॉप ही संकल्पना पुढे आली. त्यानुसार मुंबईतल्या व्यावसायिक इमारतींच्या गच्चीवर हॉटेल उभारण्याची परवानगी दिली गेली. मात्र कमला मिलमधल्या हॉटेलमध्ये भडकलेल्या आगीत 14 निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागल्यानंतर रुफ टॉपची संकल्पनाही अडचणीत आली आहे.
रुफ टॉपच्या कोणत्या प्रस्तावाला मान्यता?
रुफटॉप हॉटेलपासून 10 मीटर अंतरावर कोणतीही निवासी इमारत नसावी, अशी अट घालण्यात आली होती. तसंच मॉल आणि लॉजिंग भागात रुफ टॉप हॉटेलला परवानगी होती. अशा काही बाबी पॉलिसीत सामाविष्ट करण्यात आल्या आहेत.
महत्वाचं म्हणजे हा प्रस्ताव मंजूर करताना शिवसेना वगळता भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीनेही या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला होता. प्रचंड विरोध असतानाही शिवसेना आग्रही असलेल्या रुफटॉप हॉटेल प्रस्तावाला आयुक्तांनी परस्पर मान्यता दिली होती.
मुंबईत रुफ टॉप हॉटेलांना अखेर महापालिकेची परवानगी
आता रुफ टॉप हॉटेलच्या प्रस्तावाची अधिकृत अंमलबजावणी होण्याआधीच अनधिकृतरित्या कार्यरत असलेल्या रुफ टॉप हॉटेलचं भयानक वास्तव समोर आलं. त्यामुळे नियम आणि अटी टाकूनही या प्रस्तावाची चांगली अंमलबजावणी होईलच यावर शंका उपस्थित केली जात आहे.
पालिका अधिकाऱ्यांच्या वर्तुळातही रुफ टॉप हॉटेलचा प्रस्तावही नको अशीच भावना आहे. त्यामुळे आधीपासूनच वादग्रस्त ठरलेला रुफ टॉप हॉटेलचा प्रस्ताव आयुक्त मागे घेणार असल्याची जोरदार चर्चा आहे.