वसई : स्वतःचा जीव धोक्यात घालून महिला पोलिसाने वसई स्टेशनवर एका महिलेचा जीव वाचवला आहे. मुंबईतील वसई रोड रेल्वे स्थानकात शनिवारी दुपारी सव्वाचार वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

सुमित्रा ओला असं जिगरबाज महिला पोलिसाचं नाव आहे. संबंधित महिला वसई रोड रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरुन 4 वाजून 14 मिनिटांनी चर्चगेटकडे जाणारी लोकल पकडत होती. मात्र ट्रेनमध्ये चढताना ती खाली पडली.

लोकल सुरु झाल्यानंतर महिला पडल्यामुळे लोकल आणि प्लॅटफॉर्ममधील मोकळ्या जागेत तिचे पाय अडकले. ती फरपटत जात असल्याचं पाहताच प्लॅटफॉर्मवर ऑन ड्यूटी असलेली महिला पोलिस प्रसंगावधान राखून आली.

तात्काळ पोलिसाने महिलेचा हात पकडला. यात ती स्वतः खाली पडली, पण महिलेचा हात ना सोडता तिने तसाच धरुन ठेवला आणि तिचा जीव वाचविला आहे. हा सर्व प्रकार स्थानकातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.