मुंबई : ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमात काही क्षण डोळ्यांच्या कडा ओल्या करणाऱ्या पत्रांनी तमाम मराठी माणसांच्या काळजाचा ठाव घेतला. लेखक अरविंद जगताप यांच्या हृदयस्पर्शी लेखनातून साकारलेली ही पत्रं आता पुस्तकाच्या रुपात आली आहेत. ग्रंथाली प्रकाशनाने या पत्रांचा संग्रह ‘पत्रास कारण की...’ या पुस्तकाच्या रुपाने प्रकाशित केला आहे.


प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. दादरमधील किर्ती महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित ग्रंथालीच्या 43 व्या वाचक मेळाव्यात हा प्रकाशन सोहळा पार पडला.

यावेळी अरविंद जगताप यांच्यासह व्यासपीठावर त्यांचे वडीलही उपस्थित होते. त्यासोबत, अभिनेता निलेश साबळे, अभिनेते रमेश भाटकर, सिनेदिग्दर्शक संजय जाधव यांनीही हजेरी लावली.

अरविंद जगताप यांनी यावेळी पत्रासोबतच्या आपल्या जुन्या आठणींना उजाळा दिला. पत्र लिहिण्याची आवड महाविद्यालयीन काळापासूनच असल्याचेही त्यांनी नमूद केले आणि काही आठवणीही रसिकांना सांगितल्या.

(लेखक अरविंद जगताप मनोगत व्यक्त करताना)

‘चला हवा येऊ द्या’सारख्या विनोदी कार्यक्रमात पत्राच्या रुपाने पाच ते दहा मिनिटे वातावरण काहीसं गंभीर करणारं पत्र वाचण्याची कल्पना प्रत्यक्षात येऊ दिल्याबद्दल अरविंद जगताप यांनी निलेश साबळेंचे आभार मानले. त्याचसोबत, आपल्या आवाजातील चढ-उतारांचा यथेच्छ वापर करत, रसिकांपर्यंत अगदी अस्सल भिडणाऱ्या भावनांसह शब्द पोहोचवणाऱ्या अभिनेता सागर करंडेचेही आभार मानायला अरविंद जगताप विसरले नाहीत.

दरम्यान, मनाला भावणाऱ्या आणि काळजाला भिडणाऱ्या अरविंद जगताप यांच्या पत्रांचा ऐवज पुस्तक रुपाने वाचकांसमोर यावं, अशा भावना अनेकांनी आतापर्यंत व्यक्त केल्या होत्या.

(प्रकाशन सोहळ्यात पुस्तक विक्री करणारे पोस्टमन काका)

पोस्टमन काकांकडून पुस्तक विक्री !      

‘पत्रास कारण की...’ पुस्तकाची विक्रीही हटके पद्धतीने केली जात होती. या प्रकाशन सोहळ्यादरम्यान किर्ती महाविद्यालयाच्या प्रांगणात एकजण सागर कारंडेप्रमाणे पोस्टमन काकाच अवतरले होते. ते प्रत्येक वाचकाकडे जाऊन पुस्तक खरेदी करण्याबाबत विचारणा करत होते. त्यामुळे हे पोस्टमन काका सगळ्यांच्याच आकर्षणाचे केंद्र बनले होते.