बदलापूर : एकीकडे वडापावमध्ये पाल सापडण्याचं सत्र सुरु असतानाच, बदलापुरात आता बुंदीच्या लाडूत अळ्या सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऐन सणासुदीच्या काळात समोर आलेल्या या प्रकारामुळे ग्राहक चांगलेच धास्तावलेत.


वांगणीला राहणारे किरण मेढेकर हे गुरुवारी संध्याकाळी बदलापूरच्या कात्रप भागात राहणारे त्यांचे मित्र शशांक सिनलकर यांच्याकडे येत होते. शशांक यांच्याकडे गणपती असल्यानं त्यांनी प्रसाद म्हणून मधुरम स्वीट्स नावाच्या दुकानातून अर्धा किलो बुंदीचे लाडू घेतले. मात्र घरी गेल्यावर हे लाडू उघडून खात असतानाच त्यात अळ्या असल्याचं निदर्शनास आल्यानं त्यांनी तडक हे दुकान गाठून दुकानदाराला जाब विचारला.

यावेळी लाडूतल्या काजूमधून या अळ्या लाडूत गेल्याची शक्यता असल्याचं सांगत दुकानदाराने जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. तसंच, दुसरे लाडू घेऊन जाण्यास सांगितलं. यावेळी किरण यांनी या दुकानाचा कारखाना पाहिला असता तिथेही प्रचंड अस्वछ वातावरण दिसून आलं. त्यामुळे या दुकानावर कारवाईची मागणी किरण मेढेकर आणि शशांक सिनलकर यांनी केली आहे.

दुसरीकडे, दुकानदाराला याबाबत विचारलं असता तक्रारदार किरण मेढेकर आणि शशांक सिनलकर यांनीच आपल्याकडे 20 हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप दुकानदार रमेश त्रिवेदी यांनी केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच म्हणजे 23 ऑगस्ट रोजी बदलापूरजवळील अंबरनाथमध्ये वडापावमध्ये मेलेली पाल आढळल्याचा प्रकार समोर आला होता.