Worli Hit And Run Updates: मुंबई : पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर (Hit And Run Case) वरळीतील (Worli News) हिट अँड रन प्रकरणानं सर्वांना हादरवलं आहे. वरळीत शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाच्या (Shinde Group) उपनेत्याच्या मुलानं एका महिलेला आपल्या महागड्या गाडीनं चिरडलं. याप्रकरणी पोलिसांनी शिवसेनेच्या उपनेत्याला अटक केली आहे. पण, अपघातावेळी गाडीत उपस्थित असलेला शिवसेना उपनेत्याचा मुलगा आणि अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह मात्र अद्याप फरार आहे. आता मिहीर शाह विरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. 


वरळी हिट अॅन्ड रन प्रकरणी मुख्य आरोपी मिहीर शाह विरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. मिहीर शाह 24 तासांपासून फरार आहे. या प्रकरणात त्याचे वडील राजेश शहा आणि चालक यांना अटक करण्यात आली आहे. मिहीरच्या शोधासाठी पोलिसांची 6 पथकं रवाना झाली असून तो परदेशात पळून जाणार असल्याचा संशय पोलिसांना आहे. 


अपघात प्रकरणात मिहीर शहाचे वडील राजेश शाह आणि चालक राजऋषी बिदावत यांना आजच न्यायालयात हजर केलं जाणार आहे. शिवडी कोर्ट नं 62 मध्ये दोन्ही आरोपींना आज दुपारी हजर केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह अद्याप फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची 6 पथकं पाठवली आहेत.


पोलीस तपासांत समोर आलेली धक्कादायक माहिती म्हणजे, वरळी अपघातापूर्वी मुख्य आरोपी मिहीर शाहनं आपल्या चार मित्रांसोबत मद्यप्राशन केलं होतं. 18 हजार 730 रुपये त्यांचं बिल झालं होतं. पोलिसांनी सीसीटिव्हीचा डीव्हीआर जप्त केला असल्याची माहिती जुहूतील बार मालकानं एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. 


बड्या बापाच्या पोरानं महिलेला चिरडलं 


मुंबईतील वरळीत असलेल्या प्रसिद्ध अॅट्रिया मॉलजवळ हिट अँड रनची घटना घडली आहे. अॅट्रिया मॉलजवळच असणाऱ्या वरळी कोळीवाडा परिसरात राहणारं कावेरी आणि प्रदीप नाकवा हे कोळी दाम्पत्य सकाळी माशांच्या लिलावासाठी ससून डॉकला जाण्यासाठी घराबाहेर पडलं होतं. मासे घेऊन दुचाकीवरुन परतत असताना दाम्पत्याच्या दुचाकीला एका चारचाकी गाडीनं धडक दिली.


धडक दिल्यानंतरही चारचाकी गाडीच्या चालकानं गाडी न थांबवता तशीच पळवली. त्यात त्यानं बोनेटवर पडलेल्या कावेरी नाकवा यांना फरफटत नेलं. या अपघातात प्रदीप नाकवा हे थोडक्यात बचावलं. मात्र कावेरी या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यानंतर कावेरी यांना तात्काळ मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी कावेरी नाकवा यांना मृत घोषित केलं. 


या प्रकरणात आरोपी असलेल्या मिहीर शाह हा फरार असून त्याचे वडील हे राजेश शाह हे शिवसेना शिंदे गटाचे उपनेते आहेत. राजेश शाह यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून मिहीरचा शोध सुरू आहे. या प्रकरणात मिहीर सोबत असलेल्या ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे.