मुंबई: वरळी परिसरात कावेरी नाखवा या महिलेला गाडीखाली चिरडणारा आरोप मिहीर शहा हा अद्याप फरार आहे. मिहीरचे वडील राजेश शहा हे शिंदे गटाचे पदाधिकारी असून त्यांनीच अपघातानंतर मिहीरला (Mihir Shah) पळून जाण्याचा सल्ला दिल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली होती. मात्र, या सगळ्या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एक थिअरी मांडली आहे. मिहीर शहा हा वरळी अपघातानंतर (Worli Accident) घटनास्थळावरुन पळून जाण्यामागे एक कारण आहे आणि तो येत्या काही तासांत पोलिसांना सापडेल. हा व्यवस्थित रचलेला एक प्लॅन आहे, असा दावा रोहित पवार यांनी केला. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 


यावेळी रोहित पवार यांनी म्हटले की, अपघात झाल्यानंतर एखादी व्यक्ती घटनास्थळावरुन का पळून जाते? त्याने मद्यप्राशन किंवा ड्रग्जचे सेवन केले असेल तर त्याचा अंश 48 किंवा 70 तासांच्या कालावधीत रक्तामधून निघून जातो. त्यामुळे वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा पुढील 15 ते 20 तासांमध्ये पोलिसांच्या हाती लागेल. मग पोलीस त्याची तपासणी करतील, तेव्हा कळेल की, त्याने दारु किंवा ड्रग्जचे सेवन केले नव्हते. उलट तीच महिला गाडीच्या मध्ये आली आणि अपघात झाला, असा सेटअप रचला जाईल, असे रोहित पवार यांनी म्हटले. हे सरकार पॉवरफुल लोकांसाठी आहे. राजेश शहा यांच्याकडे पैसा आहे, ते सत्तेत आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलाची चूक निघणार नाही, असेही रोहित पवार यांनी म्हटले.


राज्यातील यंत्रणा श्रीमंत आणि ताकदवान लोकांसाठी काम करते: रोहित पवार


महाराष्ट्रात 2014 नंतर जी सिस्टीम तयार झाली आहे, ती यंत्रणा श्रीमंत व्यक्ती, राजकीय नेते आणि ताकदवान नेत्यांना मदत करणारी आहे.  ही यंत्रणा गरिबांना मदत करणारी नाही. वडील हे मुलाला मदत करणारच, पण वरळी हिट अँड रन प्रकरणात सरकारने ज्यांच्यावर अन्याय झालाय त्या लोकांना मदत केली पाहिजे. राज्य सरकारने आता सरकारी योजनांची जाहिरात करण्यासाठी 5500 कोटी रुपये खर्च करण्याचा घाट घातला आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले.


आणखी वाचा


'वरळी हिट अँड रन' प्रकरणात मृत पावलेली महिला जेष्ठ अभिनेत्याची सख्खी पुतणी, संतप्त प्रतिक्रिया देत म्हणाले, 'फाशी झालीच पाहिजे...'


लेकाला वाचवण्यासाठी राजेश शहांचा प्लॅन, गाडीवरचं धनुष्यबाणाचं चिन्ह काढलं, टोईंग व्हॅनही बोलावली इतक्यात...