Worli Car Accident : वरळी हिट अॅड रन प्रकरणात आरोपी मिहीर शाह चालवत असलेली गाडी हा मुख्य पुरावा असून तो पुरावाच लपवण्याचा आरोपींचा डाव होता अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. अपघात झाल्यानंतर गाडी कलानगरमध्ये बंद पडली होती. ती गाडी राजेश शाह यांनी अज्ञातस्थळी लपवण्याचा प्रयत्न केल्याचा आणि गाडीवरील पक्षाचं चिन्ह, नंबरप्लेट बदलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
मुंबईतील वरळीत असलेल्या प्रसिद्ध अॅट्रिया मॉलजवळ हिट अँड रनची घटना घडली. कावेरी नाखवा आणि प्रदीप नाखवा यांच्या दुचाकी गाडीला मिहीर शाहने मागून धडक दिली. त्यामध्ये कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला आहे. मिहीर शाहने दारूच्या नशेत गाडी चालवली असून तो फरार आहे.
नंबरप्लेट बदलण्याचा प्रयत्न
अपघात झाल्यानंतर आरोपी मिहीर शाहने घटनास्थळावरून पळ काढला, पण पश्चिम द्रुतगती मार्गे तो पुढे जाणार तोच त्याची गाडी वांद्रे कलानगर दरम्यान बंद पडली. यावेळी गाडी वांद्रे कलानगर येथे सोडून मिहीरने पळ काढला. या घटनेची माहिती मिहीरने त्याचे वडील राजेश शाह यांना दिली. त्यानंतर राजेश शाह हे कलानगर येथे गाडी बंद पडलेल्या ठिकाणी पोहचले. त्यावेळी राजेश शाह यांनी गाडीवरील पक्षाचे चिन्ह आणि नंबरप्लेट काढून ती बदलण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
इतकंच काय तर अपघात झालेली ती गाडी टो करण्यासाठी टोव्हिंग व्हॅनही पाचरण करण्यात आली होती. या अपघातात गाडी हाच मुख्य पुरावा असल्याने ती अज्ञात स्थळी लपवण्याचा आरोपींचा डाव असल्याचा संशय पोलिसांना आहे.
मुलाला पळून जाण्याचा सल्ला
आरोपी मिहीरच्या निर्दयी कृत्यानंतर शिवसेना शिंदे गट उपनेते राजेश शाह यांनी त्याला पळून जाण्याचा सल्ला दिल्याचं समोर आलं. मिहीरने कावेरी नाखवा यांना गाडीने धडक दिल्यानंतर त्यांना दोन किलोमीटरपर्यंत फरफटत नेले होते. वरळी सी लिंक येथे मिहीरने गाडी थांबवली. त्यानंतर त्याने बंपरमध्ये अडकलेल्या कावेरी नाखवा यांना बाहेर काढल्यानंतर राजऋषी गाडीच्या स्टेअरिंगवर बसला.
राजऋषीने गाडी बाजूने नेणे अपेक्षित असताना, गाडी पाठीमागे घेत कावेरी यांच्या अंगावर गाडी घालून तेथून पळ काढल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच सीसीटीव्हीतही ही घटना कैद झाली आहे.
पुणे पोर्शे प्रकरणाप्रमाणे, वरळी 'हिट अॅड रन' प्रकरणातही मुख्य आरोपी मिहीरला त्याचे वडील आरोपी शिवसेना शिंदे गट उपनेते राजेश शहा यांनी 'तू पळून जा, अपघात चालकाने केला आहे सांगू असा सल्ला दिला होता अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
*या प्रकरणातील मुख्यआरोपी मिहिर शहा हा अद्याप फरार असून मिहिर शहाच्या शोधासाठी मुंबई पोलिसांनी 11 पथके स्थापन केली आहेत. याशिवाय गुन्हे शाखाही मिहीरचा शोध घेत आहे.
दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी वांद्रे कलानगर परिसरातून आरोपी राजेश शाहा आणि राजऋषी राजेंद्र सिंग बिडावत यांना ताब्यात घेतले. या गुन्ह्यातील सहभाग निश्चित झाल्यानंतरच पोलिसांनी दोघांवर अटकेची कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राजेश शाहला जामीन मंजूर
वरळी हिट अॅन्ड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाहाचे वडील शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मुख्य आरोपी मिहीर शाह अपघातापासून फरार आहे. त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. या प्रकरणात त्याचे वडील राजेश शाहा आणि चालक यांना अटक करण्यात आली होती. तर दुसरा आरोपी राजऋषी राजेंद्र सिंगला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
BMW हिट अँड रन प्रकरणात मुख्य आरोपीचे वडील राजेश शहा आणि ड्रायव्हर राजऋषी राजेंद्र सिंह बिदावत यांना आज मुंबईतील शिवडी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीचे वडील राजेश शहाची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. न्यायालयीन कोठडी मिळताच राजेश शाहाने जामीनासाठी अर्ज केला. न्यायालयाने आरोपी राजेश शाहाला जामीन मंजूर केला. 15,000 रुपयांच्या तात्पुरत्या रोख रकमेवर जामीन मंजूर करण्यात आला.
ही बातमी वाचा: