मुंबई : सध्या वरळी हीट अँड रन प्रकरात नवनवे खुलासे होत आहेत. ज्या बीएमडब्ल्यू गाडीने एका महिलेला चिरडले त्या गाडीत मुख्यमंत्री एकनात शिंदे यांच्या शिवसेनेचे उपनेते राजेश शहा (Rajesh Shaha) यांचा मुलगा मिहीर शाहा असल्याचं म्हटलं जातंय. मिहीर त्याच्या ड्रायव्हरसोबत अपघातग्रस्त गाडीतून प्रवास करत होता. दरम्यान, अपघाताआधी आरोपी मिहीरने नेमकं काय केलं? तो नेमका कुठे गेला होता? याचा घटनाक्रम समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मिहीर शहा हा 24 वर्षांचा आहे. 


अपघातापूर्वी मिहीरने नेमकं काय केलं? 


मिळालेल्या माहितीनुसार वरळी हीट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहा हा 24 वर्षाचा आहे. घटनाक्रमानुसार मिहीर शहा हा रात्री जुहू येथील एका बारमध्ये मध्यप्रशन करत होता. त्यानंतर तो गोरेगावला गेला होता. घरी गेल्यानंतर त्याने आपल्या ड्राइवरला लाँग ड्राईव्हला जाण्याचे सांगितले. प्रवासादरम्यान तो मुंबईत आला आणि मुंबईतून पुन्हा गोरेगावला निघाला. गोरेगावला जाताना मिहीर शहा हा स्वतः गाडी चालवत होता. त्याच वेळी अट्रिक मॉलजवळ अपघात झाल्याचे म्हटले जात आहे. अपघाताची घटना घडली तेव्हा मिहीर शहाने मध्यप्रशन केले होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


मिहीरचा फोन बंद, पोलिसांकडून शोध चालू 


या प्रकरणात मिहीर शहासोबत राजरुपी राजेंद्र सिंग बिडावत हा त्याचा चालक होता. वरळीतील नेहरू तारांगण येथील बसस्टाॅपच्या विरूद्ध दिशेला सकाळी 5.15 वाजता हा अपघात झाला. अपघातावेळी गाडीत मिहीर शहा आणि चालक राजरुपी राजेंद्र सिंग बिडावत हे दोघेही होते. सध्या मिहीरचा फोन बंद येत असून त्याचा शोध सुरू आहे.


अपघात झाल्यानतंर मिहीरने काढला पळ


वरळीतील हीट अँड रन प्रकरणात बीएमडब्ल्यूने एका दाम्पत्यास उडवले. यात महिलेचा मृत्यू झालाय तर मृत महिलेचा पती जखमी आहे. हा अपघात झाल्यानंतर मिहीर शाहानं अपघाताच्या स्थळावरून पळ काढला. त्यानंतर त्याने आपला मोबाईल बंद करून ठेवला. मिहीर शहा सध्या फरार आहे. तर पोलिसांनी शहाच्या गर्लफ्रेंडला ताब्यात घेतलं आहे. अपघातानंतर गाडीवर असलेल्या पक्षाचे चिन्ह खोडून काढण्याचाही प्रयत्न झाला. या प्रकरणावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अपघाताचा हा घृणास्पद प्रकार आहे. वेळीच ब्रेक मारला असता तर त्या महिलेचा जीव वाचला असता. चालकाने पळून जाण्याच्या नादात महिले फरफटत नेले. या प्रकरणात 302 चा गुन्हा लावला पाहिजे, अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली.


 हेही वाचा :


महिलेला चिरडलं, तिथून गोरेगावला गर्लफ्रेंडचं घर गाठलं; वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहा फरार, गर्लफ्रेंड पोलिसांच्या ताब्यात


Worli Heat And Run: वरळी हीट अँड रनमधील BMW वर पक्षाचं चिन्ह; अपघातानंतर खोडण्याचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?


'...तर मराठ्यांच्या नेत्यांनाही पाडा'; मनोज जरांगे यांचं मोठं विधान, सरकारवरही केला गंभीर आरोप