मुंबई : मुंबई सत्र न्यायालयानं साल 1999 मधील कंदहार विमान अपहरण प्रकरणातल्या 19 आरोपींना दोषमुक्त करण्याचा निर्णय योग्यच असल्याचा निर्वाळा दिला आहे. तपास यंत्रणा या आरोपींचा या कटातील थेट सहभाग सिद्ध होईल असे कोणतेही पुरावे सादर करू शकलेली नसल्याचं कोर्टानं आपल्या निकालात म्हटलं आहे. पुढे काय घडणार आहे, किंवा हे पासपोर्ट कुणासाठी आहेत याची त्यांना कल्पना नव्हती केवळ रूपये 300 ते 2500 पर्यंतची लाच स्विकारत या सर्वांनी कागदपत्रांची योग्य पडताळणी न करता ते पुढे सरकावले होते. असा युक्तिवाद त्यांच्यावतीनं बचावपक्षाच्या वकीलांनी कोर्टात केला.


या 19 जणांत काही पासपोर्ट एजंट, पासपोर्ट ऑफिसमधील कर्मचारी, पोस्टमन, अतिरेक्यांना लायसन्स बनवून देणारे मोटर ट्रेनिंग स्कूलमधील कर्मचारी यांचा समावेश आहे. या संदर्भात पोलिसांनी सादर केलेल्या 28 साक्षीदारांचे साक्षी पुरावे यांच्यावरील आरोप सिद्ध करण्यास पुरेसे नसल्याचं सांगत साल 2012 मध्ये जिल्हा दंडाधिकारी कोर्टानं या आरोपींना दोषमुक्त केलं होतं.


या निर्णयाला सरकारी पक्षानं सत्र न्यायालयात आव्हान दिलं होतं. या सर्व आरोपींवर फसवणूक, खोटी कागदपत्र बनवणे, मुख्य आरोपींना मदत करणे आणि कटात सामिल असल्याचे आरोप होते. या प्रकरणी एकूण 23 आरोपींना अटक झाली होती. ज्यापैकी काहींची याआधीच निर्दोष मुक्ताता झालीय, तर काही जण जेलमध्येच मृत्यूमुखी पडले.


24 डिसेंबर 1999 रोजी काठमांडू, नेपाळ इथून दिल्लीसाठी उड्डाण केलेल्या आय.सी. 814 या इंडियन एअर लाईन्सच्या विमानाचं उड्डाण करताच दहशतवाद्यांनी अपहरण केलं होतं. त्यानंतर हे विमान दिल्लीऐवजी अफगाणिस्तानातील कंदहार विमानतळावर नेण्यात आलं. या विमानातील 189 प्रवाश्यांना ओलीस ठेवत दहशतवाद्यांनी भारत सरकारकडे काही मागण्या केल्या होत्या. ज्यात मसूद अझहरसह तीन दहशतवाद्यांना सोडण्याचीही मागणी करण्यात आली होती. भारत सरकारवर दबाव आणण्यासाठी दहशतवाद्यांनी 25 वर्षांच्या एका प्रवाशाची हत्या केली होती.