मुंबई: आज संपूर्ण राज्याचं लक्ष ठाकरेंच्या विजयी मेळाव्याकडे लागलं आहे. तब्बल 18 वर्षांनंतर आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. विजयी मेळाव्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. हिंदीच्या मुद्यावर ठाकरी तोफा धडाडणार आहेत. ठाकरे बंधूंच्या (Uddhav- Raj Thackeray) विजयी मेळाव्याची तयारी पूर्ण झाली असून आज सकाळी 11.30 वाजता मेळाव्याला सुरुवात होणार आहे. ठाकरेंच्या विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसेना, मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं मुंबईकडे रवाना झाले आहेत. अनेक कार्यकर्ते, नागरिक हे  या मेळाव्यासाठी डोममध्ये हजर झालेले आहेत. दरम्यान कार्यक्रमाच्या आधी ठाकरेंचे मामा चंद्रकांत वैद्य यांनी उपस्थिती लावली. यावेळी माध्यमांनी त्यांना प्रश्न केला असता त्यांच्या चेहऱ्यावरती काहीसे भावनिक भाव दिसून आले. यावेळी बोलताना चंद्रकांत वैद्य म्हणाले, 'शब्द फुटत नाहीयेत इतका आंनद झालाय', असंही ते म्हणाले.

Continues below advertisement


राज-उद्धव ठाकरे एकत्र येतानाचा क्षण अनुभवण्यासाठी मेळाव्याच्या ठिकाणी तोबा गर्दी झाल्याचं दिसून येत आहे. या कार्यमासाठी मोठी गर्दी झाली आहे. मेळाव्याच्या एक तासआधी सभा ठिकाणी मोठी गर्दी झाली आहे. मेळाव्याचं ठिकाण 75 टक्के भरलं आहे. ठिकाणाच्या बाहेर देखील मोठ्या स्क्रिन लावण्यात आलेल्या आहेत. वरळी डोम मेळाव्याच्या तासभर आधीच हाऊसफुल्ल झालं आहे. 


राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांचीही भाषणं  होणार आहेत, सकाळी 11.30 वाजता राज ठाकरे, उद्धव ठाकरे वरळी डोमला पोहोचणार आहेत, यानंतर कार्यक्रम सुरू होणार आहे. सुरूवातीला प्रकाश रेड्डीचं भाषण होईल त्यानंतर शेकापचे जयंत पाटील यांचं भाषण होणार आहे..या कार्यक्रमात सुप्रिया सुळेंचही भाषण होणार आहे. त्यानंतर राज ठाकरेंचं भाषण होणार असून उद्धव ठाकरेचं भाषण सगळ्यात शेवटी होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान काँग्रेस नेते आल्यास त्यांनाही भाषणाची संधी दिली जाणार आहे.


स्टेजवर फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 


मराठी अस्मितेसाठी एकत्र आलेले ठाकरे बंधू आज विजयी मेळावा घेणार आहेत. यापार्श्वभूमीवर राज्यभरातून अनेक कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. अशातच आता या मेळाव्याबाबत मोठी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्टेजवर फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बसणार आहेत. तर, इतर सर्व मान्यवर स्टेजखाली पहिल्या ओळीत बसतील, भाषणं फक्त 4 जणं करतील ऐनवेळी एकादा चेहरा वाढेल, अशी माहिती मिळत आहे. 


समोर आलेल्या माहितीनुसार व्यासपीठावरती केवळ ठाकरे बंधू असणार आहेत. एन्ट्री सुद्धा ग्रँड होईल, अशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे. याचाच अर्थ व्यासपीठावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे असतील. मराठी विजयी मेळाव्यात प्रकाश रेड्डी, जयंत पाटील (शेतकरी पक्ष), सुप्रिया सुळे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे अशी भाषणं होतील. (जर कांग्रेसचे नेते आले तर त्यांना भाषण दिलं जाईल, अशी शक्यता आहे.)  शेवटी समारोपाचं भाषण उद्धव ठाकरे यांचं असेल. यावेळी वरळी डोमच्या बाहेर हाजी अली, वरळीला जाणारे दोन्ही रस्ते पॅक होतील. तिथे स्क्रीन लावली जाणार आहे. बहुदा दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी बंद केले जातील.