विरार : पुरोगामी महाराष्ट्राला लाजीरवाणी घटना मुंबई जवळच्या विरारमध्ये घडली आहे. अकरा वर्षाच्या पोटच्या मुलीला बरं करण्यासाठी आईने अघोरी उपचार करुन तिचं आयुष्यच संपवलं. सानिया भेकरे असं मृत मुलीचं नाव आहे.
मुलीच्या पोटात दुखत होतं, शौचास होतं नव्हतं. म्हणून आईने तिच्यावर अघोरी उपचार केले. मुलीच्या पोटावर बसून आईने अमानवीपणे तिच्या गुप्तांगात आणि तोंडात हात टाकून उपचार करण्याचा प्रयत्न केले. परंतु यात त्या निष्पाप मुलीचा मृत्यू झाला.
विरार पूर्वेकडील मनवेलपाडा इथे 18 डिसेंबर रोजी ही घटना घडली. जीवदानी प्रसन्न इमारतीत चौथ्या मजल्यावर भेकरे कुटुंब गेल्या एक वर्षापासून भाड्याने राहत आहे. अंबाजी भेकरे कॅटरेसचा व्यवसाय करतात. त्यांच्या घरात त्याची पत्नी मिनीक्षी, 14 वर्षाचा मुलगा यश आणि 11 वर्षांची मुलगी सानिया राहत होते. मात्र गेल्या दोन दिवसापासून सानियाला शौचास होत नव्हतं. तिच्या पोटात सारखं दुखत होतं. औषधोपचार केले, मात्र गुण काही आला नाही आणि 18 डिसेंबरच्या मध्यरात्री होत्याचं नव्हतं झालं.
18 डिसेंबरच्या रात्री सानियाची आई मिनाक्षीच्या अंगात आलं आणि ती आपल्या मुलीवर उपचार करु लागली. मुलीला जमिनीवर पाडलं. पोटावर बसून सानियाच्या तोंडात आणि गुप्तांगात हात टाकून ती उपचार करु लागली. 11 वर्षाची सानिया आजाराने त्रस्त होती. आईला विरोध करण्याची तिच्यात ताकदच नव्हती. सानियाच्या भावाने आईला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने त्याला धुडकावलं. धक्कादायक म्हणजे सानियाची मावशी माधुरी शिंदेने सानियाचे पाय पकडले. वडिलांनीही सानियाची मदत न करता, मिनाक्षीची साथ दिली आणि श्वास कोंडून सानियाचं जीवनच संपलं.
भेकरे कुंटुब मागील एक वर्षापासून या इमारतीत राहतं. हे कुटुंब इमारतीमधील कोणाशीही फारसं बोलत नव्हतं. 18 डिसेंबरच्या त्या रात्री शेजाऱ्यांना आवाज आला. मात्र झोपेत कुणीतर बडबडत असेल, असं वाटल्याने त्यांनी दुर्लक्ष केलं. सानिया आजारी असल्याचं शेजाऱ्यांनाही माहित होतं.
घरच्यांनी सानियाच्या मृत्यूचं कारण लपवून ठेवलं होतं. सानियाच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आला आणि अहवालानंतर तिच्या मृत्यूचं बिंग फुटलं. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. आरोपी मिनाक्षी आपल्या शरीरात देव असल्याचं भासवत होती आणि त्यातून ती सर्वांना बरं करेल, असा तिचा फाजील आत्मविश्वास वाढत चालला होता.
विरार पोलिसांनी सानियाचे वडील, आई आणि मावशीला अटक करुन त्यांच्याविरोधात हत्या, पुरावा नष्ट करणं यासारखे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.