वसई : घरी लवकर पोहचण्यासाठी घेतलेला शॉर्टकट वसईतील मायलेकाच्या जीवावर बेतला आहे. सिग्नलला थांबलेल्या एक्स्प्रेसमधून उतरल्यानंतर लोकलच्या धडकेत पूजा आणि भव्या शर्मा यांचा मृत्यू झाला.
वसईच्या गोकुळ वाटिका इमारतीतील रहिवासी असलेले अमित शर्मा हे आईवडील, पत्नी आणि मुलासह दिल्लीहून निजामुद्दीन त्रिवेंद्रम एक्स्प्रेसने वसईच्या घरी परतत होते. मंगळवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास एक्स्प्रेस वसईजवळ एका सिग्नलपाशी थांबली. सिग्नलच्या समोरच शर्मा कुटुंबीयांच्या घराकडे जाण्याचा रस्ता होता, म्हणून त्यांनी तिथेच उतरण्याचा निर्णय घेतला.
पूजा या मुलगा भव्याला घेऊन खाली उतरल्या तर अमित त्यांना दाराजवळ सामान आणून देत होते, मात्र तेवढ्यात आलेल्या लोकलने त्यांना धडक दिली. या अपघातात मायलेकाचा दुर्दैवी अंत झाला.