खासदार श्रीकांत शिंदेंनी लावलेली 20 हजार झाडं जाळली
एबीपी माझा वेब टीम | 20 Dec 2017 03:01 PM (IST)
राज्य सरकारच्या वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होत अंबरनाथजवळच्या मांगरुळ गावात तब्बल एक लाख झाडं लावण्यात आली होती.
अंबरनाथ : राज्य सरकारच्या एक कोटी वृक्ष लागवड मोहिमेत लावलेल्या झाडांना अज्ञातांनी आग लावल्याची संतापजनक घटना अंबरनाथ तालुक्यातील मांगरुळ गावात घडली आहे. या वर्षीच्या जुलै महिन्यात कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ही झाडं लावली होती. राज्य सरकारच्या वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होत अंबरनाथजवळच्या मांगरुळ गावात तब्बल एक लाख झाडं लावण्यात आली होती. मात्र या झाडांना आणि संपूर्ण डोंगराला काल रात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी आग लावली. यात थोडी-थोडकी नव्हे, तर तब्बल 20 हजार झाडं जळून खाक झाली आहेत. या घटनेमागे स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांचा हात असल्याची चर्चा आहे. याप्रकरणी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.