डोंबिवली : पत्नी जीन्स आणि टी शर्ट घालून कामावर जाते, म्हणून पतीने तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली आहे. सुजाता जाधव असं या महिलेचं नाव असून ती तिचा पती सुधीर जाधव याच्यासोबत डोंबिवलीच्या कोपर परिसरात वास्तव्याला आहे.


सुजाता आणि सुधीर दोघेही नोकरी करतात. मात्र पत्नीचं जीन्स आणि टी शर्ट घालून कामावर जाणं सुधीरला पसंत नव्हतं. पत्नीने जीन्स-टीशर्ट ऐवजी साडी किंवा ड्रेस घालून कामावर जावं, असं सुधीरचं म्हणणं होतं. सुजाताच्या जीन्स-टी शर्ट घालण्यावरुन तसंच घरातील कामांवरुन दोघांमध्ये नेहमीच वाद व्हायचे. याशिवाय सुजाताने तिच्या मित्रांशी चॅटिंग करण्यालाही सुधीरचा विरोध होता..

बायको कपडे धुवायला, घरकामं करायला सांगायची, त्रासाला कंटाळून प्रेमविवाह केलेल्या तरुणाची पुण्यात आत्महत्या

सुजाता मंगळवारी (10 डिसेंबर) रात्री कामावरुन घरी आली. कपड्यांवरुन त्यांच्यात वाद झाल्यानंतर सुधीरने सुजाताला बेदम मारहाण करत तिचा गळा दाबला. यावेळी सुजाता बेशुद्ध पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचं समजून सुधीर हा स्वतःच रामनगर पोलिस ठाण्यात हजर झाला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता सुजाता जिवंत असल्याचं आढळल्याने तिला आधी डोंबिवलीत आणि तिथून मुंबईच्या सायन हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. याप्रकरणी सुधीर याला हत्येच्या प्रयत्नात पोलिसांनी अटक केली आहे.

स्त्री-पुरुष समानतेच्या कितीही गप्पा मारल्या जात असल्या तरी आजही समाजात स्त्री, महिलांवर अनेक निर्बंध घातले जातात. असाच धक्कादायक प्रकार सुशिक्षित आणि सुंस्कृत समजल्या जाणाऱ्या डोंबिवलीत उघडकीस आला आहे.