मुंबई : दहिसरमध्ये राहणाऱ्या शीतल साळवी नावाच्या महिलेची 5 दिवसांपूर्वी नायर रुग्णालयात प्रसूती झाली. सीजेरियन करुन तिची प्रसूती करण्यात आली होती, त्यामुळे तिला रुग्णालयातच ठेवण्यात आले. गुरुवारी संध्याकाळी शीतल झोपलेली असताना एक अनोळखी बाई वॉर्डमध्ये आली आणि शीतलच्या बाळाला चोरून घेऊन गेली.


बाळ चोरीला गेल्यामुळे हे प्रकरण आग्रीपाडा पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. आग्रीपाडा पोलिसांनी IPC कलम 363 (अपहरण)चा गुन्हा दाखल करून बाळाचा शोध सुरु केला. सर्वप्रथम पोलिसांनी रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा त्यांना बाळ चोरुन नेणारी महिला सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसली.

काही पुरावे हाती लागताच पोलिसांनी अवघ्या काही तासात बाळाला शोधून काढले आहे. बाळ सांताक्रूझमधील एका रुग्णालयात सापडले. त्यानंतर पोलिसांनी बाळाच्या वडिलांना बोलावून बाळाची ओळख करून घेतली. दरम्यान पोलिसांनी बाळ चोरुन नेणाऱ्या महिलेला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, बाळ सापडल्यामुळे बाळाचे कुटुंबीय आनंदी आहेत, तर नायर रुग्णालयाच्या हलगर्जीपणाबाबत तक्रारदेखील करत आहेत. रुग्णालयात इतक्या नर्स, डॉक्टर्स आणि सुरक्षारक्षक असूनही बाळाला कुणीही चोरुन कसं काय नेऊ शकतं? असा सवाल शीतल साळवीच्या भावाने केला आहे.

व्हिडीओ पाहा



पोलिसांनी बाळाला काही तासांच्या आत शोधून काढले असले तरी, नायर रुग्णालयाच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. काही दिवसांपूर्वी रुग्णालयातील डॉ. पायल तडवी हीने या रुग्णालयात आत्महत्या केली होती. त्यामुळे हे प्रकरण खूप तापले आहे. अशातच आता बाळ चोरीचे प्रकरण समोर आल्यामुळे रुग्णालय प्रशासनाची पंचाईत झाली आहे.