मुंबई : शीना बोरा हत्याकांड प्रकरणात माफीचा साक्षीदार बनलेल्या श्यामवर रायच्या जामीन अर्जावर आता हायकोर्टात सुनावणी होणार आहे. श्यामवर रायनं कोर्टाला लिहिलेल्या पत्राची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयानं या पत्राचं याचिकेत रूपांतर केलं आहे.


तसेच या प्रकरणात कोर्टाच्या मदतीसाठी अमायकस क्युरीची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. गुरूवारी श्यामवर रायला सीबीआय कोर्टात हजर केलं असता त्यानं आपली प्रकृती ठिक नसल्याचं माहीती असूनही पोलीस आपल्याला हॉस्पिटलला दाखल करत नाहीत अशी तक्रार त्यानं कोर्टाकडे केली आहे.


साल 2012 च्या शीना बोरा हत्याकांडात अटक झालेला पहिला आरोपी आणि इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर असलेल्या श्यामवर रायनं मुंबईच्या सीबीआय कोर्टात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. आपल्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचं कारण त्यानं या अर्जात पुढे केलं होतं.


मात्र श्यामवर राय हा या हायप्रोफाईल केसमधील महत्त्वपूर्ण माफीचा साक्षीदार असल्यानं बाहेर त्याच्या जीवाला धोका आहे, असा दावा करत सीबीआयनं या जामीन अर्जाला विरोध केला होता. हा विरोध ग्राह्य धरत मुंबई सत्र न्यायालयानं हा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर श्यामवर रायनं मुंबई उच्च न्यायालयातील मुख्य न्यायमूर्तींना याबाबत पत्र लिहीलं होतं.


बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्या प्रकरणी श्यामवर रायला सर्वप्रथम अटक झाली होती. त्यानंतर श्यामवर रायच्याच कबुली जबाबामुळे या संपूर्ण हत्याकांडाचा खुलासा झाला होता. शीना बोराच्या हत्येसाठी तिची आई इंद्राणी मुखर्जी, इंद्राणीचा पूर्वपती संजीव खन्ना यांना शीनाची हत्या केल्याबद्दल तर इंद्राणीचा पती पीटर मुखर्जी याला संपूर्ण कटाची माहीती असूनही सत्य लपवल्याबद्दल अटक करण्यात आली आहे.