मुंबई : खड्ड्यात पडून दररोज कुणी मरतंय तर कुणी जखमी होतंय. मुंबईचे खड्डे सध्या मृत्यूचे सापळे बनत चालले आहेत. बुधवारी ताडदेवमध्य़े खड्ड्यांमुळे एक महिला स्कूटरवरून पडून गंभीर जखमी झाली. आदिती काडगे (35) असे या जखमी महिलेचे नाव आहे. आदिती यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. सध्या त्यांच्यावर भाटिया रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत. ताडदेव येथील फॉरजेट हिल परिसरात राहणाऱ्या आदिती या एच आर एक्सिक्युटिव्ह आहेत. बुधवारी ताडदेव पोलीस स्टेशनकडे आदिती स्कूटरवरून जात होत्या. पोलीस स्टेशनजवळील मोठय़ा खड्डय़ामध्ये तोल जाऊन त्या स्कूटरवरून खाली पडल्या. अपघातानंतर ताडदेव पोलिसांनी त्यांना तात्काळ नायर रुग्णालयामध्ये दाखल केले. पुढील उपचारांसाठी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने भाटिया रुग्णालयामध्ये दाखल केलं. आदिती यांच्या डोक्याच्या आणि चेहऱ्याच्या डाव्या भागाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातामध्ये डोक्याच्या उजव्या बाजूला, डोळ्याजवळ आणि उजव्या हाताच्या कोपरालाही मार लागला आहे. सध्या त्या अर्धवट शुद्धीमध्ये आहेत.