कल्याण : कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या लोकलमधून तरुणीचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न झाला. चोराचा पाठलाग करताना धावत्या ट्रेनमधून उडी मारणारी तरुणी गंभीर जखमी झाली आहे, तर मोबाईल चोराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
लोकल ट्रेनमध्ये मोबाईल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मध्य रेल्वेवरील मुंब्रा स्थानकात शुक्रवारी अशीच एक घटना घडली. रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास ठाण्याहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या स्लो लोकलमधून 28 वर्षीय सुस्मिता अनिल आणेकर प्रवास करत होत्या.
लोकल मुंब्रा स्थानकात थांबली असताना एक जण त्यांच्या डब्यात शिरला. ट्रेन सुरु होण्याच्या आधी त्याने सुस्मिता यांच्या हातातील महागडा मोबाईल हिसकावून धक्काबुक्की केली. चालत्या लोकलमधून उडी मारताना चोरटा रेल्वे प्लॅटफॉर्मवर पडला आणि पसार झाला. चोराच्या पाठोपाठ सुस्मिता यांनीही रेल्वेतून उडी मारली, मात्र त्या गंभीर जखमी झाल्या.
रेल्वे स्थानकावरील प्रवाशांनी सुस्मिता यांना फोर्टिस रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करुन सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरु केला.
सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला चोरटा मुंब्रा परिसरातील अमृतनगरचा रहिवासी असल्याचं समजलं. 19 वर्षीय सोहल रफिक अंसारी अमृतनगर परिसरातच लपून बसल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून चोरट्याला काही वेळातच अटक केली. त्याच्याकडून 70 हजार रुपये किमतीचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला.