मुंबई | माझं नाव कन्हैया अंबानी असतं तर माझ्यावर देशद्रोहाचा आरोप झाला नसता, असं म्हणत सीपीआयच्या विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारने विविध मुद्द्यांवर उघडपणे आपली मतं मांडली आहेत. ‘माझा कट्टा’वर कन्हैया कुमारने जेएनयू वाद, पीएचडी, तसंच आजवरच्या प्रवासावर दिलखुलास गप्पा मारल्या.


केंद्रीय गृहमंत्र्यांनी माझे संबंध दहशतवादी हाफिज सईदशी असल्याचं विधान केलं होतं. मात्र आता सरकारच मला सुरक्षा पुरवत आहे. देशभर मी फिरतो तिथे मला सरकारकडून सुरक्षा पुरवली जाते. जर माझे संबंध हाफिज सईदशी असतील तर सरकार मला सुरक्षा का पुरवतं? असा सवालही कन्हैया कुमारने उपस्थित केला. तसंच गृहमंत्र्यांनी या विधानासाठी देशाची माफी मागावी अशी मागणीही केली.

माझ्यावर जेएनयूमधील वादानंतर देशद्रोहाचा आरोप करण्यात आला. जर मी कन्हैया अंबानी असतो तर हा आरोप झाला नसता. मी एका सामान्य कुटुंबातील असल्यामुळे मुद्दाम मला यात गोवण्यात आल्याचंही कन्हैयाने म्हटलं आहे. देशात कमकुवत लोकांची संख्या जास्त असल्याचा फायदा घेतला जात आहे. मात्र ज्यादिवशी सर्व कमकुवत लोक एकत्र येतील त्यादिवशी फायदा उठवणाऱ्यांची ताकत कमी होईल असा विश्वासही त्याने व्यक्त केला.

दरम्यान पीएचडीबद्दल कन्हैयाला प्रश्न विचारत आला. वयाच्या 30 व्या वर्षी मी पीएचडी मिळवली, जी सर्वसाधारणपणे इतक्याच वयात मिळते. पण मला प्रश्न विचारणाऱ्यांना मी आणखी एक प्रश्न विचारतो, मोदींना त्यांनी 35 व्या वर्षी MA का केलं असा प्रश्न कुणी का विचारत नाही? असा प्रतिप्रश्नही त्याने विचारला. आपण लोकांच्या कररुपी पैशांचा अपव्यय न केल्याचंही त्याने नमूद केलं.