मुंबई : मुंबई सत्र न्यायालयातील एनआयए कोर्टात सुरु असलेल्या मालेगाव ब्लास्ट केसमध्ये सोमवारी आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर यांची स्फोटात वापरलेली बाईक, इतर काही सायकली पुरावा म्हणून सादर करण्यात आले. हे पुरावे तपासण्यासाठी न्यायाधीशांना वकील, साक्षीदार आणि आपल्या स्टाफसह कोर्टाखाली उतरावं लागलं. यावेळी साक्षीदारांनी बॉम्ब ब्लास्टच्या दिवशी हीच मोटरसायकल तिथं पाहिल्याचं कोर्टाला सांगितलं.


सोमवारी सकाळच्या सत्रात सरकारी पक्षाने एका टेम्पोत भरुन मालेगाव ब्लास्टमध्ये वापरण्यात आलेली मोटरसायकल आणि काही सायकली पुरावे म्हणून मुंबई सत्र न्यायालयाच्या आवारात आणल्या. या गोष्टी कोर्टरुममध्ये आणणं शक्य नसल्याने तपासणी करण्यासाठी एनआयए कोर्टाचे न्यायाधीश विनोद पाडाळकरांसह कोर्टातील कर्मचारी आणि वकील हजर झालेल्या साक्षीदारांसह कोर्टाखालच्या गल्लीत जमा झाले होते.

यावेळी न्यायाधीश विनोद पाडाळकर यांनी स्वत:देखील टेम्पोत शिरुन मोबाईल टॉर्चच्या सहाय्याने पुराव्यांची पाहणी केली. यावेळी त्यांच्या कपड्यांवर काही ठिकाणी टेम्पोच्या ग्रीसचे डाग पडल्याचं पाहायला मिळालं.

टेम्पोतील सायकलींचा केवळा सांगाडा शिल्लक होता, तर मोटरसायकलच्या मागच्या भागाचाही पूर्ण चुराडा झाला होता. मात्र मोटरसायकलचा पुढचा भाग पूर्णपणे शाबूत होता. एलएमएल कंपनीच्या या बाईकच्या हेडलाईवर लिहिलेलं 'फ्रीडम' हे नाव स्पष्टपणे दिसत होतं.

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या मालकीच्या याच एलएमएल फ्रीडमवर स्फोटकं ठेवल्याच्या आरोपाखाली त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.