मुंबई : शीना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी आणि पीटर मुखर्जी हे मीडिया सर्कलमधले बंटी बबली होते, असा दावा एका साक्षीदारानं केला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार या साक्षीची प्रत मंगळवारी पीटर मुखर्जीला देण्यात आली.
'इंद्राणी ही एक कारस्थानी, फेरफार करणारी, अतिशय महत्त्वाकांक्षी महिला आहे. पीटरनं कंपनीचे सर्व अधिकार इंद्राणीला दिले होते.मी पीटरच्या कंपनीत कामाला होते. मी इंद्राणीला ओळखते. ती पीटरची दुसरी पत्नी आहे. पीटरने आधीच्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर इंद्राणीसोबत विवाह केला. पीटरने कंपनीतील सर्व अधिकार इंद्राणीला दिले होते. तिच्या जाचाला कंटाळून कंपनीमधील अनेक अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला', असं साक्षीदाराने म्हटलं आहे.
'काही दिवसांनी पीटर व इंद्राणी हे परदेशात गेले. त्यांना भारतात पुन्हा व्यवसाय करायचा होता. त्यासाठी त्यांनी मीडियात काम करणाऱ्यांसाठी पार्टी ठेवली होती. हे दोघेही मीडियातील बंटी आणि बबली होते, असे या साक्षीदाराने तीन पानांच्या जबाबात म्हटलं आहे. या साक्षीदाराचा जबाब मिळावा यासाठी पीटर यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला होता.
एप्रिल 2012 मध्ये शीना बोराची हत्या करण्यात आली होती. हत्येप्रकरणी गेल्या वर्षी पोलिसांनी इंद्राणी, तिचा पहिला पती संजीव खन्ना आणि चालक श्यामवर राय याला अटक केली. हे चौघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.