मुंबई : विधीमंडळ आणि विधानपरिषदेच्या हिवाळी अधिवेशनला आजपासून मुंबईत सुरुवात होणार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय पहिल्याच दिवशी सभागृहात पटलावर मांडला जावा, अशी मागणी विरोधीपक्षांनी केली आहे. मात्र सरकार अहवाल सादर न करता थेट विधेयकाचा मसूदा तयार करुन विधेयक सभागृहात आणणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


मसुदा तयार करण्यासाठी साधारण दहा दिवसांचा कालावधी लागणार असल्याने तो 29 नोव्हेंबर रोजी सभागृहात पटलावर ठेवला जाण्याची शक्यता आहे.

मराठा समाजाला 'एसईबीसी' या स्वतंत्र प्रवर्गाखाली आरक्षण देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली होती. मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचं राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातून समोर आलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यावरुन शिवसेना अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आक्रमक होणार आहे. या अधिवेशनातच समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव जाहीर करा, अशी मागणी शिवसेनेचे आमदार मुख्यमंत्र्यांना भेटून करणार आहेत.

हिवाळी अधिवेधशनाच्या पूर्वसंध्येला 'ठगबाजीची चार वर्षे' अशा बॅनरखाली विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलं होतं. विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी हा पोरकटपणा असल्याचं म्हटलं. राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर विरोधकांनी गंभीर होण्याची गरज असल्याचा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला होता.

आमिर खानच्या 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटाच्या पोस्टरची कॉपी करत विरोधकांनी 'ठग्ज ऑफ महाराष्ट्र'चं पोस्टर तयार केलं होतं. या पोस्टरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना ठगांच्या रुपात दाखवण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला होता.