कल्याण : दक्षिणेकडून गोव्यामार्गे गुजरातला जाणाऱ्या कोचिवेल्ली-पोरबंदर एक्सप्रेसमधून रेल्वे पोलिसांनी मोठा मद्यसाठा जप्त केलाय. जनरल डब्याच्या शौचालयाच्या वरच्या भागात हा मद्यसाठा लपवून ठेवण्यात आला होता.
गोव्याच्या मडगाव रेल्वे स्थानकात या गाडीत मोठा मद्यसाठा चढवण्यात आल्याची गुप्त माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पनवेल ते कोपर स्थानकांदरम्यान कल्याण आरपीएफने या गाडीत शोधाशोध केली असता जनरल डब्यात शौचालयाच्या छताच्या आत वोडकाच्या तब्बल 2 हजार बाटल्या लपवण्यात आल्याचं आढळलं.
या मद्यसाठ्यासोबत कुणीही सापडलं नाही. हा मद्यसाठा दारुबंदी असलेल्या गुजरातमध्ये नेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यामागे मोठं रॅकेट असल्याची शक्यता यानंतर व्यक्त होत आहे.