मुंबई : “ब्राझील टीमसोबत मेजवानी नव्हे तर फक्त त्यांची भेट घेतली,” असं स्पष्टीकरण मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिलं आहे. एलफिन्स्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाला. मात्र आपले नेतेमंडळी पार्टी आणि गरबा खेळण्यात मश्गूल असल्याचा आरोप होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेऊन महाडेश्वर यांनी उत्तर दिलं.


“आपल्या घरी एखादा पाहुणा आल्यावर आपण त्याचं स्वागत करतो. मुंबईचा महापौर म्हणून त्यांचं स्वागत केलं. तिथे कोणत्याही प्रकारची मेजवानी किंवा पार्टी नव्हती. रोषणाई नव्हती, बडेजाव नव्हता. कोणतंही नृत्य नव्हतं, काहीही नव्हतं. इथे आम्ही त्यांना फक्त स्नॅक्स आणि चहा दिला. त्यांच्याशी हस्तांदोलन केलं. ते निघत असताना, युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे इथे आले आणि त्यांना भेटले,” असं महापौरांनी सांगितलं.

एलफिन्स्टनच्या दुर्घटनेदिवशी मुंबई महापौरांची फुटबॉल खेळाडूंसाठी मेजवानी

दरम्यान, महापौरांनी यावेळी भाजप नेते आशिष शेलार यांच्यावरही जोरदार टीका केली. शेलार यांनी जाणीवपूर्व आरोप केले, कारण त्यांच्या पक्षाचे किरीट सोमय्या दुर्घटनेच्या संध्याकाळी दांडिया रासमध्ये थिरकले.

“त्यांच्या पक्षाप्रमाणेच इतर पक्षातही असंवेदनशील नेते आहेत, असं कदाचित आशिष शेलार यांना वाटत आहे. शेलार बिनबुडाचे आरोप करतात. आशिष शेलार दुर्घटनेवेळी कुठे होते, ते मंत्रीमहोदयांच्या स्वागतात मग्न होते. त्यांनी जखमींची चौकशी तरी केली का?” असे प्रश्न महापौरांनी विचारले.

“पाहुण्यांचं स्वागत करणं ही संवेदनशीलता आहे. ज्यांना यात वावगं वाटतंय त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते,” असंही महापौर म्हणाले.

“संवेदनशील नेतृत्त्वाने संवेदनशीलपणेच काम करावं, मग तो कुठल्याही राजकीय पक्षाचा असेना. त्यामुळे गरबा खेळताना संवेदनेचा विचार करावा. तसंच परदेशातून आलेल्या फुटबॉल प्लेअर्सना महापौर बंगल्यावर जेवण देताना ती संवेदनशीलता हवी होती,” असं आशिष शेलार म्हणाले होते.

एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर रात्री किरीट सोमय्या गरबा खेळत होते?

पाहा व्हिडीओ