मुंबई : ठाकरे कुटुंब आणि शिवसेना हे घट्ट समीकरण आहे. मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकत असला, तरी ठाकरे घराण्यातील व्यक्ती आतापर्यंत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली नाही. मात्र ठाकऱ्यांची तिसरी पिढी कदाचित आखाड्यात स्वतः उतरु शकते. बाळासाहेब ठाकरेंचा नातू, उद्धव ठाकरेंचे ज्येष्ठ सुपुत्र आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी गरज पडल्यास स्वतः निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे.


'इंडियन एक्स्प्रेस' या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आदित्य ठाकरेंनी यासंदर्भात सूतोवाच केलं आहे. 'मी कधीच स्वतःला निवडणुकांपासून दूर ठेवलेलं नाही. जर कधी वेळ पडलीच तर मी तयार आहे' असं आदित्य यांनी म्हटलं आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने आदित्य ठाकरे प्रचारसभा आणि बाईक रॅली काढत आहेत.

बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे निवडणुकांपासून स्वतः दूर राहिले, मात्र गरज पडली तर आदित्य विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. आमदार म्हणून बरंच काम करण्यासारखं आहे, असंही त्यांना वाटतं. 'जेव्हा आजोबांनी निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यामागे त्यांचे काही विचार असतील. मात्र त्यांनी आपली मतं आमच्यावर लादली नाहीत.' असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

'निवडणुका लढवणं चुकीचं आहे किंवा आपण कधीच निवडणुका लढवता कामा नये, असे आदेश त्यांनी आम्हाला दिले नाहीत. त्यांच्या निर्णयाचं शिवसेना पक्षाने आणि जनतेने स्वागतच केलं' असंही आदित्य म्हणाले. भाजप सरकार ज्या-त्या गोष्टीचं श्रेय लाटत असल्याने दुःख होत असल्याचं आदित्य म्हणतात. श्रेयवादामुळे फडणवीस सरकार हे ट्विटर सरकार होण्याइतपत खालच्या पातळीला गेलं आहे.

काँग्रेस सरकारने बांधलेल्या मेट्रोचं श्रेयही भाजप हिरावून घेतल आहे, त्यामुळे पक्षाची वागणूक खूप बालिश असल्याचं चित्र आहे, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली. मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये युती तुटल्यानंतर शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढणार आहेत. त्यानंतर दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर चिखलफेक सुरु आहे. त्यामुळे महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.