नवी मुंबई : नवी मुंबईतल्या नेरुळमध्ये एका नऊ वर्षांच्या चिमुरड्याचा स्कूल बसखाली चिरडून मृत्यू झाला आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आईच्या डोळ्यादेखतच बसने विद्यार्थ्याला धडक दिली होती. सोमवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबईतल्या नेरुळमधील सेक्टर 27 भागात राहणारा सामवेद तरळकर एनसीआरडी स्टर्लिंग स्कूलमध्ये शिकतो. शाळेतून परत आलेला सामवेद त्याच्या स्कूल बसमधून उतरला. इश्वर ब्लिस या आपल्या बिल्डिंगकडे येण्यासाठी तो रस्ता ओलांडत होता. पलिकडे असलेल्या इमारतीच्या गेटवर त्याची आई त्याला आणण्यासाठी उभी राहिली होती.
त्याचवेळी भरधाव वेगानं आलेल्या दुसऱ्या एका प्रायव्हेट स्कूलबसने सामवेदला जोरदार धडक दिली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे चिमुरड्याच्या आईच्या डोळ्यांदेखतच हा अपघात घडला. सामवेदला तात्काळ नेरुळमधील अपोलो रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र त्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं होतं.
21 वर्षीय आरोपी बसचालक गोविंद रायला अटक करण्यात आली आहे. सामवेदला उडवल्यानंतर चालकाने बससह पळ काढला. अन्सारी एन्टरप्रायझेसने गोविंदची नियुक्ती केली होती. त्याच ऑफिसमधून त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गोविंदला रॅश ड्रायव्हिंग आणि हलगर्जीमुळे विद्यार्थ्याच्या मृत्यूला जबाबदार ठरल्याप्रकरणी अटक झाली आहे.
संबंधित चालकाने बेदरकारपणे बस चालवल्यामुळेच आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा जबाब, त्याच्या आईने दिला आहे. सामवेदचे वडील विद्याधर तरळकर हे अंधेरीतील एका बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत आहेत, तर त्याची आई गृहिणी आहे. सामवेदची सहा वर्षांची धाकटी बहिण सेंट ऑगस्टिन शाळेत शिकते.