मुंबई : बायकोचे टोमणे हे पतीसाठी क्रूर वर्तन आहे, असा निर्वाळा देत मुंबई हायकोर्टाने 62 वर्षीय पतीला घटस्फोट मंजूर केला आहे. लग्नाच्या 23 वर्षांनी पतीने घटस्फोटाचा अर्ज केला होता, त्यानंतर तब्बल 22 वर्षांनी कोर्टाने अर्ज मंजूर केला.
घर म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच. पती-पत्नीमध्ये छोट्या-मोठ्या कुरबुरी रोजच्याच असतात. मात्र पत्नीने सतत पतीला मारलेले टोमणे हे क्रौर्य असल्याचा निर्वाळा मुंबई हायकोर्टाने दिला. अखेर लग्नाच्या 45 वर्षांनी 62 वर्षीय पतीला अखेर काडीमोड मिळाला.
1972 साली त्यांचं लग्न झालं होतं. 23 वर्षांनंतर म्हणजे 1995 मध्ये पतीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. अपत्य नसल्याच्या कारणावरुन जोडप्यात वारंवार भांडणं होत असल्याची माहिती आहे.
पत्नी आपल्याशी कधीच नीट वागली नाही, मूल होत नसल्यामुळे ती सतत टोमणे मारते, असा आरोप त्यांनी केला होता. उभयतांमधला वाद विकोपाला गेल्यामुळे 1993 पासून ते विभक्त राहत होते.
घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर टोमणे मारण्याच्या मुद्द्यावरुन कनिष्ठ न्यायालयाने त्यांचा घटस्फोट नामंजूर केला होता. त्याविरुद्ध त्यांनी हायकोर्टात दाद मागितली.
या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती के. के. तातेड आणि एस. के. कोतवाल यांच्या खंडपीठाने मूल न होण्यावरुन टोमणे मारणं ही क्रूरता असल्याचं म्हणत त्यांचा घटस्फोट मंजूर केला. मात्र पत्नीला दरमहा खर्च देण्याचा आदेश देत पत्नी राहत असलेल्या घराबाबतही वाद न करण्यास सांगितलं आहे.