मुंबई : पत्नी बदलण्याची ऑफर दिल्यानं मुंबईत मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हत्याप्रकरणाचा छडा पोलिसांनी एका फोन कॉलवरून लावला आहे.


मुंबईच्या मालवणीमध्ये वाईफ स्वाईपची ऑफर दिल्यानं एका मित्रानं दुसऱ्याची हत्या केली आहे. घराशेजारीच राहणारा मित्र रईस करिमुल्लाच्या हत्येप्रकरणी मालवणी पोलिसांनी शाहरुख अन्सारीला बेड्या ठोकल्या आहेत.

रईस करिमुल्ला आणि शाहरुख अन्सारी हे एकमेकांचे जीवलग मित्र होते. लग्नाआधी ते दोघं एकमेकांची प्रेयसी बदलत होते. लग्नानंतर देखील त्यांनी वाईफ स्वॅपिंग म्हणजेच पत्नीची अदलाबदल करण्याचं वचन दिलं होतं. याला रईस करिमुल्लाची काहीच हरकत नव्हती. मात्र, रईसनं आपल्या पत्नीसोबत वेळ घालवणं शाहरूखला मान्य नव्हतं.

रईस करिमुल्ला वारंवार वाईफ स्वॅपिंगचा विषय काढायचा यामुळे शाहरुख अन्सारी खूप वैतागला होता. दोनच दिवसांपूर्वी रईसचा कायमचा काटा काढायचा असं ठरवून शाहरुखनं त्याला एका निर्जन स्थळी बोलवलं. त्यावेळी रईसनं बरंच मद्यसेवन केलं होतं. त्यावेळी दारुच्या नशेत असलेल्या रईसची अखेर शाहरुखनं हत्या केली.

खुनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मृत व्यक्तीचं नाव रईस करिमुल्ला असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी त्याचा मोबाइल फोन तपासला. ज्यामधून सर्वात जास्त कॉल शाहरुखला करण्यात आले होते. त्यामुळं पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी शाहरुखला अटक केली.

शाहरुखनं गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.