मुंबई : सत्तेतून बाहेर पडण्यावरुन शिवसेनेत गटबाजीला उधाण आलं आहे. एकीकडे सत्तेत असून कामं होत नसल्याने सत्तेतून बाहेर पडण्यासाठी एक गट आग्रही आहे. तर दुसरीकडे सत्तेतून बाहेर पडू नये, यासाठी मराठवाड्यातील आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना साकडं घातलं.

पुन्हा एकदा निवडणुकांना सामोरं जाण्याची तयारी नसल्याने सत्तेतून बाहेर पडू नये, असं यापूर्वी शिवसेनेच्या पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांनी म्हटलं होतं. तर पुन्हा निवडणुका झाल्या तर त्या लढवणं कठीण आहे. त्यामुळे सत्तेतून बाहेर पडू नये, अशी मागणी मराठवाड्यातील आमदारांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन केली.

शिवसेना दसरा मेळाव्याला सत्तेतून बाहेर पडण्याची घोषणा करु शकते, अशी चर्चा आहे. मात्र असा कुठलाही निर्णय झाला नसल्याचं आश्वासन उद्धव ठाकरेंनी आमदारांना दिलं. त्यामुळे शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही, हे जवळपास स्पष्ट झालं आहे.

दुसरीकडे, येत्या दसऱ्याला जर शिवसेनेनं सत्तेतून बाहेर पडण्याची घोषणा केली, तर शिवसेनेत खिंडार अटळ असल्याचा पुनरुच्चार अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला आहे. शिवसेनेचे 20 ते 22 आमदार शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात न राहता भाजपसोबत असतील, असं रवी राणा म्हणाले होते.

संबंधित बातम्या :

शिवसेनेने सत्ता सोडल्यास 20-22 आमदार ‘वर्षा’वर : रवी राणा


शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही, सत्तेत राहून भाजपला धारेवर धरणार!


सच्चा साथीदाराने सेना आमदार उदय सामंतांची साथ सोडली!