मुंबई : नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाचं गूढ दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. कारण की, काल (सोमवार) दिल्लीत झालेल्या बैठकीनंतरही राणेंचा पक्षप्रवेश रखडलेलाच आहे. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परदेश दौऱ्यावर आहेत. 29 सप्टेंबरला ते भारतात परतणार आहेत. त्यानंतरच राणेंच्या प्रवेशाबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे.

जोपर्यंत मुख्यमंत्री भारतात येत नाहीत तोपर्यंत राणेंच्या प्रवेशाबाबत नेमका निर्णय होणार नसल्याची माहिती सुत्रांकडून समजते आहे.

नारायण राणेंनी काल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली. पण यावेळी त्याच्यात कोणत्याच वाटाघाटी झाल्या नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री जेव्हा परत येतील तेव्हाच राणेंबाबत निर्णय घेतला जाईल.

दुसरीकडे भाजपच्या एका गटाचा राणेंच्या पक्षप्रवेशाला विरोध आहे. राणेंनी भाजपमध्ये न येता त्यांनी स्वत:चा पक्ष काढावा अशी त्यांची इच्छा आहे. राणेंनी स्वत:चा पक्ष काढल्यास त्याला भाजपनं पाठिंबा द्यावा अशी त्यांची मागणी आहे. पण दुसरीकडे भाजप हायकमांड राणेंना पक्षात घेण्यासाठी अनुकूल असल्याचं समजतं आहे.

मात्र, असं असलं तरी राणेंना भाजपमध्ये घेतल्यानंतर शिवसेनेची नेमकी भूमिका काय असणार याबाबत देखील भाजपची चाचपणी सुरु आहे. राणे भाजपत आल्यानंतर भाजप आणि शिवसेनेचे संबंध आणखी ताणले जाण्याचीही शक्यता आहे.

VIDEO :



संबंधित बातम्या :

राणे-शाहांच्या बैठकीत नेमकं काय काय झालं?