नवी मुंबई : लग्नाच्या पाचव्या दिवशी विवाहितेच्या हत्येची घटना नवी मुंबईत घडली आहे. या हत्येप्रकरणी पती, सासू-सासरे आणि पतीच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे. प्रियंका गुरव असे मृत विवाहितेचं नाव आहे.
धक्कादायक म्हणजे प्रियंकाच्या शरिराचे तुकडे करून रबाले एमआयडीसी परिसरात फेकून देण्यात आले होते. विवाहितेच्या गळ्यावर काढलेल्या टॅटूच्या मदतीने तिची ओळख पटवून नवी मुंबई पोलीसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या.
आयुष्याची स्वप्न बघणारी 23 वर्षीय प्रियंका गुरव आता हयातीत नाही. तिचा मृतदेह शीर आणि कंबर नसलेल्या अवस्थेत 6 मे रोजी नवी मुंबई पोलिसांना रबाले एमआयडीसीच्या परिसरात सापडला होता.
आरोपी पती सिद्धेश गुरव, सासू माधुरी गुरव, सासरे मनोहर गुरव आणि त्यांचा मित्र दुर्गेश पटवा या आरोपींना हत्या करणे, कट रचणे आणि पुरावा नष्ट करणे या आरोपांखाली अटक केली आहे.
प्रियंकाच्या अंगावर असलेल्या ओम आणि गणपतीच्या टॅटूमुळे तिची खरी ओळख समोर येऊ शकली.
मूळची डोंबिवलीतल्या प्रियंकाचा तिचा कॉलेज मित्र सिद्धेश गुरवसोबत 30 एप्रिल रोजी प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर सासरी म्हणजे वरळीत राहायला गेली होती. 4 मे रोजी पती, सासू, सासरा यांनी प्रियंकाची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर प्रियंकाच्या पतीने मित्र दुर्गेश पटवाच्या मदतीने तिच्या शरिराचे तुकडे करुन रबाले एमआयडीसीमध्ये टाकले.
8 मे रोजी रबाले पोलिसांना तरूणीची ओळख पटल्यानंतर सासरच्यांना अटक करण्यात आली. चारित्र्याच्या संशयावरुन प्रियंकाची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांन वर्तवला आहे.