नवी दिल्ली : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी दिल्लीत व्हावं यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. दिल्ली मराठी प्रतिष्ठाननं त्यासाठी अ.भा.साहित्य महामंडळाकडे रीतसर निमंत्रण सादर केलेलं आहे. हे आमंत्रण मान्य झाल्यास सहा दशकानंतर राजधानी दिल्लीत मराठी सारस्वतांचा मेळा भरेल.


1954 साली दिल्लीत अ.भा.मराठी साहित्य संमेलन भरलेलं होतं. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. महाराष्ट्राबाहेर बडोदा, हैदराबाद, इंदूर, बेळगाव या ठिकाणी मराठी साहित्य संमेलनं पार पडलेली आहेत. पण दिल्लीला 60 च्या दशकानंतर पुन्हा हा योग प्राप्त झालेला नाही. त्यामुळेच दिल्ली मराठी प्रतिष्ठाननं हे आमंत्रण साहित्य महामंडळाला पाठवलेलं आहे.

याच दिल्ली मराठी प्रतिष्ठाननं दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाचं इंडिया गेटवर आयोजन केलेलं होतं. इंडिया गेटसारख्या अत्यंत महत्वाच्या ठिकाणी असं सांस्कृतिक आयोजन केल्यानं तेव्हा दिल्लीत याची बरीच चर्चाही झालेली.

दिल्लीत अनेक मराठी बांधव तर राहतातच, पण गुडगावसारख्या ठिकाणीही ही संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या आयोजनानं मराठी संस्कृतीचा ठसा राजधानीतही उमटेल अशी प्रतिष्ठानला आशा आहे.

जयपूर लिटरेचर फेस्टिवल, कोलकात्यातला बोई मेला, शिवाय दिल्लीतला वर्ल्ड बुक फेअर यासारख्या साहित्यिक आयोजनांची राष्ट्रीय पातळीवर चर्चा होत असते. पण महाराष्ट्रासारख्या राज्यात दरवर्षी साहित्यिक मेळ्याची जी एवढी मोठी परंपरा आहे ती या निमित्ताने दिल्लीकरांना समजेल अशी आशा आहे.

साहित्यिक महामंडळाकडे दरवर्षी अशा आयोजनासाठी विविध शहरातल्या मराठी संस्थेकडून अर्ज प्राप्त होतात. त्यामुळे या रेसमध्ये दिल्ली यावेळी बाजी मारणार का याचं उत्तर अवघ्या काही आठवड्यांमध्येच कळेल.