मुंबई : "आमचे आणि शिवसेनेचे काही मुद्द्यांवर मतभेद होते. परंतु आमचे मुद्दे शिवसेनेला पटवून देण्यात आम्ही यशस्वी झालो, त्यामुळे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती झाली," अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी युतीबाबत माहिती दिली.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, "सेनेच्या मागण्यांबाबत आम्ही त्यांना सर्व कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या, त्या शिवसेनेच्या नेत्यांना पटल्या त्यामुळे ते युतीसाठी तयार झाले. आम्ही आमचे मुद्दे शिवसेनेला पटवून दिले आहेत. आगामी काळात जनतेलाही पटवून देण्यात यशस्वी होऊ."
पाटील म्हणाले की, "भाजप-शिवसेनेचं रक्ताचं नातं असल्याने युती शक्य झाली. मतभेद किंवा मनभेद झाले, तरी दोघांना ते नको असतं त्यामुळे त्यांना एकत्र यावच लागतं. दोन भाऊ लहान असतात तेव्हाचे मतभेद ठीक असतात, परंतु ते दोघे मोठे झाले की आग्रह वाढतो आणि त्यामुळे एकमत होण्यास वेळ लागतो. त्यामुळेच दोन्ही पक्षांच्या युतीला थोडा वेळ लागला."
पाटलांनी यावेळी विरोधकांवरही टीका केली. ते म्हणाले की, "शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी एकमेकांवर केलेल्या टीकेमुळे सर्वसामान्य माणूस व्यथित झाला होता. परंतु विरोधी पक्षातले नेते खुश झाले होते. विरोधकांनी कितीही देव पाण्यात ठेवले, तरी त्यांना हवं आहे, ते आम्ही होऊ देणार नाही."
जागावाटपाबात पाटील यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले की, "लोकसभेच्या जगांसाठी 23 : 25 फॉर्म्युला ठरला आहे. परंतु पालघरची जागा शिवसेनेला देण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. शिवसेनेने पालघर, भिवंडी आणि धुळेमधल्या जागांची मागणी केली होती."