मुंबई : उद्धव ठाकरेंनी संधीचं राजकारण केलं आहे, किमान मनसे अध्यक्ष राज ठाकरे संधीसाधू नाहीत, असं वक्तव्य काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी केलं आहे. मात्र महाआघाडीत मनसे समाविष्ट होणार का, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. युती झाली असली तरी शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? असा प्रश्न मिलिंद देवरा यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना उपस्थित केला.


शिवसेनेने संधीसाधू राजकारण केलं आहे. जेव्हा मोदींची लाट होती, तेव्हा सेनेने स्वतःचा फायदा करुन घेतला. जेव्हा मोदी विरोधात जनमत गेलं तेव्हा त्यांच्यावर टीका केली, अशा शब्दात देवरांनी शिवसेनेवर ताशेरे ओढले.

'मूळात मराठी माणसाला माहित आहे, शिवसेनेनं काय केलं! तीन पेंग्विन आणि शिव वडा व्यतिरिक्त सेनेने काहीच केलं नाही.
मिल कामगारांसाठी कोणी मिल खरेदी केल्या?' असा प्रश्न उपस्थित करतानाच मुंबईतील भाडेकरुंसाठी काँग्रेसने काम केल्याचा दावाही मिलिंद देवरांनी केला.

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी काम केलं नाही. त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते, जनता नाराज आहे, असा विश्वास देवरांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत पुनर्विचार करावा लागेल आणि राजकारणातूनही निवृत्ती घ्यावी लागेल, असे संकेत मिलिंद देवरांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरवरुन दिले होते. मात्र आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचंही मिलिंद देवरांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे संधीसाधू आहेत, पण राज ठाकरे किमान संधीसाधू नाहीत. मात्र राज ठाकरे आणि आमच्या विचारधारेत फरक आहे, असंही देवरांनी स्पष्ट केलं. त्यामुळे महाआघाडीत मनसेला घेण्याबाबत राष्ट्रवादी अनुकूल असली, तरी काँग्रेस त्यांना जवळ ओढणार का, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

प्रिया दत्त, संजय निरुपम आणि मुंबई काँग्रेस हा पक्षांतर्गत प्रश्न असल्यामुळे याबाबत बोलणार नसल्याचं देवरांनी सांगितलं. काही दिवसांपूर्वीच मिलिंद देवरांनी ट्विटरवरुन मुंबई काँग्रेसमधील दुफळीवर बोट ठेवलं होतं.