मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शेकाप नेते जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात मंत्रालयात दाखल झाले. परंतु, यावेळी सर्व नेत्यांनी मास्क घातलेला असताना राज ठाकरे मात्र मास्क न घालताच मंत्रालयात पोहोचले. यावर त्यांना विचारले असता त्यांनी मिश्किल उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. मास्क का नाही घातला यावर ते हसले आणि इतरांनी घातला म्हणून मी नाही घातला, असं म्हणत पुढे निघुग गेले.


कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं अनिवार्य केलं आहे. मंत्रालयात आलेल्या बहुतांश नेत्यांनी मास्क वापरलेलं होतं. जेव्हा एखादा नेता सरकारने सांगितलेले नियम पाळावे असं सांगत असतो, त्यावेळी त्याने स्वत: देखील त्याचं पालन करणं गरजेचं असतं. परंतु, राज ठाकरे यांनीच मास्क न वापरल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे देखील मास्कमध्ये होते. यावर राज यांना विचारले असता हसले आणि सर्वांनी मास्क घातले म्हणून मी घातला नाही, असं उत्तर त्यांनी दिलं.



सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं बंधनकारक आहे. या नियमाचे पालन न केल्यास हजार रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. पण राज ठाकरे मास्क न लावताच मंत्रालयात आल्याने, कोरोना व्हायरससारख्या साथीमध्ये नियम आणि अटी सामान्यांसाठी आणि व्हीआयपींसाठी वेगळ्या आहेत का? असाही प्रश्न आता विचारला जात आहे.


लॉकडाऊनबाबत सरकारचा एक्झिट प्लॅन काय?, राज ठाकरेंची विचारणा; सरकारला नऊ सूचना


राज यांच्या सरकारला सूचना
लॉकडाऊनबाबत सरकारचा एक्झिट प्लॅन काय आहे? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी बैठकीत केलेल्या सूचनांबद्दल माहिती दिली. तसंच शहराच्या एन्ट्री पॉईंटवर नियम कडक करायला हवे. प्रत्येक वेळी माणुसकी उपयोगाची नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.


Coronavirus | Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे विनामास्क मंत्रालयात दाखल | ABP Majha