दक्षिण मुंबईतील काळबादेवी परिसरातील डबल पार्किंगच्या समस्येबाबत राजकुमार शुक्ला यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. काळबादेवी परिसरातून डबल पार्किंगची समस्या दूर करावी ही प्रमुख मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरु आहे.
काळबादेवीच्या परिसरात जिथं पोलीस आयुक्तांचं कार्यालय आहे, तिथंच पार्किंगची समस्या नसावी असं विधान व्यक्त करत मुंबई ट्राफिक पोलीस हे वाहतूक नियंत्रण करण्याऐवजी फोनवर बोलण्यात मग्न असतात, या शब्दांत हायकोर्टानं पोलिसांची कानउघडणी केली.
तसेच, स्थानिकांचं याबाबतीत समुपदेशन करून यावर तोडगा काढता येईल का? अशी विचारणा केली आहे. तसेच मुंबई महानगर पालिका या समस्येबाबत काय करतेय, असा सवाल विचारत या याचिकेत हायकोर्टानं बीएमसीलाही प्रतिवादी बनवण्याचे निर्देश दिलेत.
या विभातगातील पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी अंडरग्राऊंड पार्किंग किंवा मल्टिस्टोरेज पार्किंग उभारण्याचा पालिकेचा मानस आहे का? या संदर्भात उत्तर देण्याचे निर्देश देत या याचिकेवरील सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली आहे.