Lalbaugcha Raja Visarjan 2025 : मुंबईतील लोकप्रिय गणेश मंडळांपैकी एक असणाऱ्या लालबाग सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतीची घरी जाण्याची वाट यंदा समुद्राने अडवली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण, रविवारी सकाळी साधारण पावणेआठ वाजता गिरगाव चौपाटीवर दाखल झालेल्या लालबागचा राजाचे विसर्जन अद्यापही होऊ शकलेले नाही. लालबागचा राजाच्या विसर्जनसाठी यंदा विशेष पद्धतीचा स्वयंचलित तराफा तयार करण्यात आला होता. मात्र, हाच तराफा लालबागचा राजाच्या विसर्जनाच्या मार्गातील विघ्न ठरताना दिसत आहेत. या सगळ्या गोंधळामुळे तब्बल गेल्या अडीच तासांपासून लालबागचा राजाची मूर्ती समुद्रातच अडकून पडली आहे. लालबागचा राजाच्या मूर्तीचा जवळपास अर्धा भाग पाण्यात बुडालेला आहे. याच अवस्थेत लालबागचा राजा आणि मंडळाचे कार्यकर्ते गिरगाव चौपाटीवर विसर्जनाच्या प्रतीक्षेत आहेत.

लालबागचा राजाची अर्धी मूर्ती अडीच तासांपासून पाण्यात

लालबागचा राजा काल म्हणजे शनिवारी सकाळी 10 वाजताच्या आसपास विसर्जनासाठी लालबाग येथील मंडपातून बाहेर पडला होता. त्यानंतर तब्बल 20 तासांच्या मिरवणुकीनंतर रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. त्यानंतर साधारण दीड-दोन तासात आरती होऊन लालबागच्या राजाचे विसर्जन होईल, अशी अपेक्षा होती. 

मात्र, लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचला नेमक्या त्याचवेळी समुद्राला भरती सुरु झाली. त्यामुळे लालबागचा राजासाठी तयार करण्यात आलेला विशेष तराफा हलू लागला. यावर मूर्ती ठेवणे धोक्याचे होते. त्यामुळे लालबागचा राजा मंडळाने गणपतीची मूर्ती समुद्रात थोड्या आतमध्ये नेऊन गणपतीचे सगळे दागिने काढले. त्यानंतर ज्या ट्रॉलीवरुन गणपती चौपाटीपर्यंत आणला त्यावरुन मूर्ती काढताना अडचण येत होती. 

या सगळ्यामुळे लालबागचा राजाचे विसर्जन लांबले. अखेर समुद्राची भरती ओसरल्यानंतरच  लालबागच्या राजाचे विसर्जन करायचे, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सध्या अन्य गणपती मंडळांच्या गणपतीचे विसर्जन केले जात आहे. लालबागचा राजाचे विसर्जन होण्यासाठी आणखी काही अवधी लागणार आहे.

Lalbaugcha Raja Visarjan 2025 | लालबागचा राजा विसर्जन LIVE | Ganesh Visarjan 2025

हे ही वाचा - 

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : लालबागचा राजाच्या विसर्जनात विघ्न, गणपती समुद्राजवळ नेला पण.... नेमकं काय घडलं?