Lalbaugcha Raja Visarjan 2025 : मुंबई आणि जगभरात प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या लालबागचा राजाचे विसर्जन अद्याप झालेले नाही. लालबागचा राजा विसर्जनसाठी शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास मंडपातून निघाला होता. आज सकाळी लालबागचा राजा पावणेआठच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. त्यानंतर लालबागचा राजाची आरती होऊन तो तराफ्यावर बसून समुद्रात नेला जाईल, असे अपेक्षित होते. मात्र, समुद्राला आलेली भरती आणि काही तांत्रिक अडचणींमुळे लालबागचा राजाच्या विसर्जनात विघ्न निर्माण झाल्याचे दिसत आहे.
यंदा लालबागचा राजा नेहमीपेक्षा उशिराने गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. यानंतर गर्दीतून वाट काढत लालबागचा राजा समुद्रापर्यंत नेण्यात आला. मात्र, तोपर्यंत समुद्राला भरती आली होती. लालबागचा राजाच्या विसर्जनासाठी विशेष स्वयंचलित तराफा तयार करण्यात आला होता. मात्र, समुद्राला भरती आल्यामुळे हा तराफा प्रचंड हलत होता. त्यामुळे लालबागचा राजाची मूर्ती त्यावर चढवण्यात आली नाही. यानंतर लालबागचा राजाचे दागिने काढून तो तराफ्यावर चढवण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा ज्या ट्रॉलीवर लालबागचा राजा होता, तिथून तो निघत नव्हता. त्यामुळे लालबागचा राजाचे विसर्जन लांबवणीवर पडले आहे. लालबागचा राजाचे विसर्जन होत नसल्यामुळे चिंचपोकळीच्या चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ करण्यात आला.
आता लालबागचा राजाचे विसर्जन लवकरच होईल, असे सांगितले जात असले तरी तो पुन्हा तराफ्यावर चढवला जाणार की नाही, याबाबत साशंकता आहे. पण आताच्या माहितीनुसार, लालबागचा राजाचे विसर्जन होण्यास यंदा वेळ लागणार आहे. समुद्राला भरती आल्यामुळे गणपतीची मूर्ती तराफ्यावर चढवण्यात अडचण होत आहे. सर्व बोटी दूर झाल्या, समुद्राची भरती ओसरून ओहोटी सुरु झाल्यानंतर विसर्जन होणार आहे.
हे ही वाचा -