ठाणे : महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या वेळी शिवसेनेने पाचशे स्क्वेअर फुटांच्या घरांना पूर्णतः मालमत्ता तर माफ करण्याचे आश्वासन ठाणेकरांना दिले होते. मात्र आता ज्यावेळी ठाणेकरांना या कर माफीची गरज आहे, त्यावेळी केवळ दहा टक्के सवलत देऊन ठाणेकरांची फसवणूक केल्याचा आरोप आता केला जात आहे. या सहामाहीचा संपूर्ण कर एकत्र भरल्यास पुढच्या सहामाहीच्या मालमत्ता कराच्या काही भागावर पाच ते दहा टक्के सूट देणार असल्याचे महापालिकेने काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते, त्यावर आता ठाणेकर आणि विरोधी पक्षांनी टीका केली आहे.
काही दिवसांपूर्वीच मालमत्ता कर भरण्यासाठी ठाणेकरांना उत्साहित करायला महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दहा टक्के सूट देण्याची योजना जाहीर केली. सन 2020-21 या संपूर्ण वर्षाचा मालमत्ता कर 15 सप्टेंबरपर्यत भरल्यास 10 टक्के सूट देण्यात येणार आहे. तर 16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत भरल्यास 4 टक्के, 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत भरल्यास 3 टक्के तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत भरल्यास 2 टक्के सूट देण्यात येणार आहे. यामध्ये अग्निशामक दल कर वगळण्यात आला आहे. त्यामुळे उर्वरित रक्कम पाहता ठाणेकरांना याचा अजिबात लाभ होणार नाही, अशी टीका पालिकेवर आणि सत्तेत असलेल्या शिवसेनेवर केली जात आहे. "ही कर सवलत फसवी असून यापेक्षा जास्त, निदान 50 टक्के किंवा जास्त सवलत देण्याची नाहीतर, यावर्षीचा मालमत्ता कर माफ करावा अशी मागणी मनसेच्या संदीप पाचंगे यांनी केली आहे.
पाहा व्हिडीओ : स्पेशल रिपोर्ट | मुंबईला जमलं ते ठाणे, पुणे, नागपूरला का नाही?
फक्त मनसेनेच नाही तर भाजपने देखील शिवसेनेवर आपल्या निवडणूकीतील आश्वासनाचा विसर पडला का अशी टीका केली आहे. 2017 साली झालेल्या पालिका निवडणुकीत शिवसेनेने 500 स्क्वेअर फुटांच्या घरांना पूर्णतः मालमत्ता कर माफ करू असे आश्वासन दिले होते, सध्या या आश्वासनाची पूर्तता करण्याची नितांत आवश्यकता आहे. कारण लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, त्यामुळे आपल्या आश्वासनांचा विसर सत्ताधाऱ्यांना पडला आहे का? असा सवाल ठाणे भाजपा अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी विचारला आहे.
तर विरोधकांच्या या टीकेला उत्तर देत ठाणे महानगरपालिकेचे महापौर नरेश म्हस्के यांनी लवकरच याबाबत प्रशासनाशी चर्चा करू असे सांगितले आहे. तसेच निरंजन डावखरे यांच्या प्रश्नाला प्रतुत्तर देत, केंद्रात सत्ता असूनही, भाजपने अजून कोणतेही कर का माफ केले नाहीत, असा प्रतिप्रश्न त्यांनी केलाय. आम्हाला आमच्या आश्वासनांचा विसर पडला नाही कारण ते आम्ही दिलेले वाचन आहे, असेही नरेश म्हस्के म्हणाले.
गेल्या चार महिन्यांपासून उपजीविकेचे साधन नसलेल्या अनेक ठाणेकरांना मालमत्ता कर रद्द केल्यास मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. अतिशय तुटपुंज्या सवलतीची योजना जाहीर करून ठाणे महानगरपालिका आर्थिक मंदीच्या काळात देखील लोकांकडून पैसे उकळण्याचे काम करते आहे. त्यामुळे ठाणेकरांच्या मागणीकडे लक्ष देऊन मालमत्ता कर रद्द होणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :