मुंबई : यावर्षी कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता लॉकडाऊनमधून जरी अनेक ठिकाणी शिथिलता मिळाली असली तरी जिल्हा अंतर्गत प्रवास करण्यासाठी ई-पास आणि इतर अडचणी लक्षात घेऊन भाऊ-बहीण रक्षाबंधनासाठी पोस्टाचा जुना पॅटर्नचा अवलंब करताना पाहायला मिळत आहेत. यावर्षी अनेक भावंडाना एकत्र येऊन रक्षाबंधन साजरा करता येत नसल्याने पोस्टाने अनेक बहीणींनी आपली राखी भावापर्यंत पोहचण्याचा निर्णय घेतला आहे. तर भाऊसुद्धा पोस्टाने आपल्या बहिणीला गिफ्ट द्यायचा प्लॅन करत आहे. त्यामुळे पोस्टानेसुद्धा रक्षाबंधनासाठी विशेष तयारी केली आहे. अशी माहिती नवी मुंबई विभागाच्या पोस्टमास्टर जनरल शोभा मधाळे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.


25 जुलैपासूनच रक्षाबंधनाच्या कामाला पोस्ट ऑफिसेस लागले असून आठवड्याभरात प्रत्येकाच्या राख्या, भेटवस्तू पोस्टमन घरोघरी जाऊन पोहचवणार आहेत. पोस्टाने यंदाच्या वर्षी रक्षाबंधनासाठी खास एन्व्हलप तयार केले असून त्यात राखी पाठवता येऊ शकते. रक्षाबंधनाच्या या इन्व्हलपसाठी वेगळा डेस्क पोस्ट कार्यालयात केला असून हे पत्र अगदी प्राधान्यक्रमाने पाठवले जाणार आहेत. बहीण, भाऊ कोरोनाच्या या संसर्गामध्ये कंन्टेन्मेंट झोनमध्ये जरी राहत असतील तरी त्यांच्या पत्त्यावर वेळेत राखी, भेटवस्तू पाठवण्याची जबाबदारी पोस्टाने आणि पोस्टमनने घेतली आहे. यावर्षी रक्षाबंधनाला सुद्धा चांगला प्रतिसाद पोस्ट कार्यालयामध्ये पाहायला मिळतोय.


3 ऑगस्टला रक्षाबंधन असताना पोस्टात आलेल्या सगळ्या राख्या, भेटवस्तू रक्षाबंधनाच्या दिवसापर्यंत किंवा एक-दोन दिवस आधी पोहचणे गरजेचं आहे. त्यासाठी येणाऱ्या रविवारीसुद्धा पोस्टमन या राख्या, भेटवस्तू घरोघरी पोहचवण्यासाठी कर्तव्यावर असणार आहेत. या संकटाच्या काळातही भावा-बहिणीचा प्रेम पोहचवण्याचं काम पोस्टमन करणार आहेत. त्यामुळे पूर्वीचा रक्षाबंधनाचा पोस्टाद्वारे राखी, भेटवस्तू पाठवण्याचा पॅटर्न पुन्हा एकदा नव्याने मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत असून अधिकाधिक जणांनी पोस्टाचा यासाठी लाभ घेण्याचं आवाहन पोस्ट ऑफिसेसकडून करण्यात आलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


झोपडपट्ट्यांमधील सरासरी 57 टक्के लोकांची प्रतिकारशक्तीच्या जोरावर कोरोनावर मात : सेरो सर्व्हे


मुंबईकरांसाठी गुड न्यूज! तीन महिन्यातील सर्वांत कमी कोरोनाबाधित रुग्णांची नोंद