मुंबई : खासदार संजय राऊत यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवनीत राणा यांनी युसूफ लकडावाला यांच्याकडून 80 लाख रुपयांचं कर्ज घेतलं असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. त्यामुळे हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असून नवनीत राणा यांच्यावर ईडी कारवाई करणार का असा सवालही त्यांनी विचारला आहे. 


कोण होता युसूफ लकडावाला?
युसूफ लकडावाला हा मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर होता. युसूफ लकडावाला याचे दाऊदशी संबंध असल्याचं आणि तो डी गँगचा फायनान्सर असल्याचं सांगितलं जायचं. मनी लॉन्ड्रिंगसह पैशाच्या अफरातफरीच्या प्रकरणात ईडीनं त्याला अटक केली होती. कॅन्सरग्रस्त असल्यानं आर्थर रोड कारागृहात त्याचा मृत्यू झाला.


मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 2019 मध्ये एका जमीन खरेदीप्रकरणात सरकारी कागदपत्रामध्ये फेरफार करत पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक केली होती. युसूफ लकडावाला गुजरात विमानतळावरुन लंडनला पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला अटक करण्यात आली होती. प्रसिद्ध अभिनेत्री साधना यांना 2010 मध्ये सांताक्रूज येथील जमिनीसाठी धमकावल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. नंतर या प्रकरणातून युसूफ लकडावाला याची निर्दोष सुटका करण्यात आली. 


युसूफ लकडावाला हा कुख्यात गुंड दाऊदशी संबंधित असल्याचा आणि त्याने दाऊदचे आर्थिक व्यवहार सांभाळल्याचा आरोप होता.  


नवनीत राणांवर आरोप काय?
युसूफ लकडावाला याच्याकडून नवनीत राणांनी हे 80 लाखांचं कर्ज घेतल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी नवनीत राणांचे एक अॅफिडेव्हिट शेअर केलं आहे. त्यामध्ये नवनीत राणा यांनी युसूफ लकडावाला याच्याकडून 80 लाख रुपयांचं कर्ज घेतल्याचं स्पष्ट दिसतंय. हा मुद्दा आता राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असून ईडी या प्रकरणाचा तपास करणार का असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.


संबंधित बातम्या: