Jagannath Shankarshet : देशाची आर्थिक राजधानी मुंबई...मुंबई म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो खवळणारा समुद्र, मरीन ड्राईव्ह, लोकल ट्रेन आणि बरचं काही. मुंबई म्हणजे मराठी माणसाचा जणू प्राणच. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक इथं येतात आणि त्यांचं आयुष्यच बदलून जातं. अनेक मराठी माणसांनी या मुंबईच्या विकासासाठी मोलाचं योगदान दिलं. परंतु, या मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक बाहेर गेले तर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही, या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्यानं जणू मराठी अस्मितेलाच हात घातला आणि मराठी माणूस दुखावला, संतापला. राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. पण  अखेर आज राज्यपालांना उपरती झाली आणि त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली. या संपूर्ण काळात चर्चा सुरू झाली ती मुंबईच्या विकासाच्या योगदानाबद्दल. यावेळी सर्वात आधी नाव पुढं येतं ते म्हणजे जगन्नाथ शंकरशेट मुरकुटे उर्फ 'नाना शंकरशेट यांचं. 


भारतातील पहिली रेल्वे


मुंबईच्या जडणघडणीत महत्वाचे योगदान देणाऱ्या महापुरुषांमध्ये उद्योजक, समाजसेवक व शिक्षणतज्ञ म्हणून ओळख असणाऱ्या नाना शंकर शेठ यांचे नाव अग्रभागी घ्यावे लागते. मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यामध्ये तसेच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात नानांनी अतुलनीय कार्य केले. व्यवसायातून मिळविलेला पैसा त्यांनी मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी खर्च केला. फक्त पैसाच खर्च केला नाही तर आपल्या दूरदृष्टीने मुंबईत अनेक प्रकल्प आणले आणि राबवले. याच नाना शंकर शेठ यांच्या योगदानातून भारतातील पहिली रेल्वे धावली आणि तीही मुंबईत. 


16 एप्रिल 1853 रोजी मुंबईतील बोरिबंदरहून (आताचं CSMT) ठाण्याच्या दिशेनं भारतातील पहिली रेल्वेगाडी ट्रॅकवरून धावली. या पहिल्या रेल्वे प्रवासात तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड फॉकलंड यांची पत्नी लेडी फॉकलंड यांच्यासह 400 प्रवासी होते. या 400 प्रवाशांमध्ये ब्रिटीश अधिकारी, स्थानिक जमीनदार, मुंबईतील प्रतिष्ठित नागरिकांचा समावेश होता. विशेष म्हणजे या रेल्वेत प्रथम बसण्याचा मान मोजक्याच लोकांना होता. यामध्ये जगन्नाथ शंकरशेट हा एक मराठी माणूस होता.  


मुंबईच्या विकासासाठी आपली शेकडो एकर जमीन दिली


जगन्नाथ यांचे वडील शंकरशेठ यांनी मुंबई येथे जवाहीर्‍यांच्या व्यवसायात खूप मोठी संपत्ती कमावली होती. लहान असतांनाच त्यांची आई वारली. त्यानंतर जगन्नाथ हे 18 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे देखील निधन झाले. त्यामुळे लहान वयातच त्यांच्यावर मोठी जबाबदारी पडली. कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असताना त्यांच्या मनात सामाजिक कार्याची ओढ शांत बसू देत नव्हती. अनेक शिक्षण संस्था उभा करणाऱ्या जगन्नाथ यांनी मुंबईच्या विकासासाठी आपली शेकडो एकर जमीन दिली. 


 जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 रोजी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या गावी झाला. जगन्नाथ शंकरशेट मुरकुटे हे त्यांचं पूर्ण नाव. त्यांना लहानपणापासूनचा वैयक्तिक आणि सामाजिका कार्याची जाणीव होती. 'बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी' या पश्चिम भारतातील पहिल्या शिक्षणसंस्थेच्या संस्थापकांपैकी नाना शंकरशेट हे एक होते. जगन्नाथ यांच्या प्रयत्नांतूनच 1822 साली मुंबईची हैंदशाळा आणि स्कूल बुक सोसायटीची स्थापना झाली. याच संस्थेचे पुढे 1824 साली 'बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी'त रुपांतर झाले. असं मोलाचं कार्य जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांनी केलं. त्यामुळेच त्यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातं.