मुंबई : राज्यात आणि एकूणच देशात दिवसेंदिवस नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ होत आहेत. मात्र, या नैसर्गिक संकटांमागे मानवाचाच हात असल्याचे स्पष्ट मत पर्यावरणतज्ञ अतुल देऊळगावकर यांनी माझा कट्टा या कार्यक्रमात मांडले. जगभरात विकासाच्या नावाखाली पर्यावरणाला ओरबाडले जात आहे. हे आताच थांबले नाही तर भविष्यातील पिढी आपल्याला माफ करणार नाही. विकास करण्याला माझा विरोध नाही. मात्र, हा विकास पर्यावरणपूरक असवा असेही ते म्हणाले.
म्हणून निसर्गाचा समतोल ढासळतोय
पर्यावरणतज्ञ माधवराव गाडगीळ यांच्यासह अनेकांनी यापूर्वीच निसर्गाचा समतोल ढासळत असल्याबद्दल सरकारांना जागे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यानेच अशा घटना घडत आहेत. आपण आपला इतिहास पाहिला तर भारताच्या खूप मोठ्या क्षेत्रावर जंगल होतं. मात्र, सद्यस्थितीत देशात जंगलाचे क्षेत्र खूप कमी झाले आहे. वनविभागाचा अहवाल सांगतो की दरवर्षी एक ते दोन लाख हेक्टर क्षेत्रावरील जंगल नष्ट होते. मात्र, गाडगीळकरांच्या मते दरवर्षी यापेक्षा जास्त जंगल नष्ट होत आहे.
पूरपरिस्थितीसाठी आपणच कारणीभूत
जेव्हा जंगलांमध्ये पाऊस पडतो. तेव्हा खूप कमी प्रमाणात मातीची धूप होते. मात्र, जंगल नष्ट केल्याने हजारो हेक्टर क्षेत्रातील माती धरण आणि समुद्रात वाहून जात आहे. परिणामी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. जंगल हे एकाच वेळेला आपले पाऊस, प्रदूषण यांच्यापासून संरक्षण करते. सोबतच आपल्या आरोग्याचीही काळजी घेते. उत्तराखंडमध्ये गेल्या काही वर्षांपासून अनेक नैसर्गिक आपत्ती येत आहेत. यालाही कारण, मानवी हस्तक्षेपच आहे. मोठ मोठी धरणं, रस्ते, बांधकामं या ठिकाणी सुरु आहेत. त्यामुळे या भागात नैसर्गीक आपत्ती वाढत असल्याचे मत देऊळगावकरांनी व्यक्त केले.
हवामान बदल..
ब्राझीलमध्ये असलेल्या अॅमेझोन जंगलाला पृथ्वीचे फुफ्फस म्हटले जाते. याच देशाच्या अध्यक्षांनी मागे जंगल तोडीला प्रोत्साहन दिले. यामुळे अॅमेझोन जंगल मोठ्या प्रमाणात नष्ट करण्यात येत आहे. जास्तीत जास्त जमीन शेती आणि उद्योगधंद्यासाठी मिळावी यासाठी अनेक देशांमध्ये जंगलांना आगी लावल्या जात आहे. मागली काही वर्षात ब्राझीलमध्ये एक कोटी हेक्टरवरील जंगल नष्ट केलं आहे.
सह्याद्री पोखरला जातोय
सह्याद्री संदर्भात माधवराव गाडगीळ यांनी अहवाल दिला आहे. सह्याद्री पोखरणं सुरु आहे. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यात पश्चिम घाटत खाणी सुरु आहेत. अनेक ठिकाणी जंगलं तोडून बेकायदेशीर बांधकामे सुरु आहेत. आपण पाणथळ जागेवर बांधकामं करुन पाण्याची वाट अडवतो. त्यामुळे पाणी आपली वाट काढते आणि यामुळेच पूरपरिस्थिती निर्माण होते. पर्यावरण तज्ञ अनिल अग्रवाल यांनी यापूर्वीच सांगितलं आहे, की मोठ मोठी धरणं बांधण्यापेक्षा छोट छोटी धरणं बांधली पाहिजेत. कारण, अनेक ठिकाणी धरणांमुळेच दरवर्षी पूर येत असल्याचा अनुभव आहे. आपण आपले धरण व्यवस्थापन बदलण्याचाही विचार करणार आहे की नाही? असा प्रश्न देऊळगावकर यांनी उपस्थित केला.
नैसर्गिक भिंत उभारणे अधिक सोप्पं
सुनामी आल्यानंतर अनेक तज्ञांनी समुद्रकिनारी खारपुटी लावण्यावर भर दिला होता. हिच आपली संरक्षक भिंत आहे. मात्र, महाराष्ट्राचा विचार केला तर कितीतरी खारपुटी आणि कांदळवणं नष्ट केली जात असल्याचे देऊळगावकर यांनी सांगितले.