मुंबई : हिदुत्वांचा हुंकार ऐकायला यायला पाहिजे, असं म्हणत शिवसेनेने कार्यकर्त्यांना साद घातली आहे. येत्या 14 तारखेला मुंबईतील बीकेसी मैदानात शिवसेना शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे.


भोंगा. हनुमान चालीसा, हिंदुत्व, आणि भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांवर बोलण्यासाठी उद्धव ठाकरे सज्ज झाले आहेत. एक ना अनेक मुद्द्यांवरुन गेले काही दिवस राज्याचे राजकारण चांगलंच तापलेलं आहे. गेल्या दोन महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भोंग्यांचा मुद्दा घेत महाविकास आघाडी आणि खास करुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. महापालिकेत सुरु असलेला भ्रष्टाचाराच्या विरोधात भाजपनेही पोलखोल सभा घेत शिवसेनेविरोधात रणशिंग फुकलं आहे. या सगळ्यावर उत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांची फौज सज्ज झाली आहे. 


उद्धव ठाकरेंच्या या सभेत राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे निशाण्यावर असतील. भोंग्याच्या मुद्द्यांवर राज ठाकरेंना तर महापालिकेतल्या भ्रष्टाचारावर देवेंद्र फडणवीसांना मुद्देसूद उत्तर देण्याची तयारी उद्धव ठाकरेंनी केली आहे. एवढंच नव्हे तर बंधू राज ठाकरेंच्या बदललेल्या झेंड्यापासून ते भूमिकेपर्यंतचा राजकीय प्रवास सर्वांपर्यत मांडण्याचीही शक्यता आहे. 


शिवसेना आणि दादरचं छत्रपती शिवाजी पार्क मैदान याच्यातलं नातं काही वेगळं सांगायची गरज नाही. शिवसेनेच्या आतापर्यंत मुंबईतल्या सभा शिवतीर्थावर झाल्या आहेत. पण यावेळी मात्र छत्रपती शिवाजी पार्क मैदानात सभा घेण्याऐवजी उद्धव ठाकरेंनी बीकेसी ग्राऊंडला पसंती दिली, कारण मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यातून जवळपास दीड लाख लोक येणार असल्याचा शिवसेनेचा दावा आहे 


उद्धव ठाकरेंच्या भाषणात कोणकोणते मुद्दे असतील? 


- नंबर एक - राज ठाकरे 
- नंबर दोन - देवेद्र फडणवीस 
- नंबर तीन - नवनीत राणा आणि रवी राणा 
- नंबर चार - केद्र सरकार 
- नंबर पाच - महागाई 
- नंबर सहा - केंद्रीय यंत्रणा 
- नंबर सात - आगामी निवडणुका 


असे एक ना अनेक मुद्दे घेत उद्धव ठाकरे विरोधकांवर प्रहार करतील.


शिवसेनेतर्फे गेल्या काही दिवसांपूर्वीच शिवसंपर्क अभियानाला सुरुवात करण्यात आली होती. या अभियाना अंतर्गत राज्याच्या विविध जिल्ह्यांत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्यानंतर शिवसेनेचे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा घेण्याचे निश्चित केलं आहे. बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर या सभेचे टीजर आणि पोस्टर लावण्यात आले आहेत. तेव्हा हिंदुत्वाचा हुंकार कुठपर्यंत पोहोचणार आणि कोणाकोणाला झोंबणार हे लवकर कळेल.