मुंबई : मी कुठली गोष्ट अंधारात करणार नाही, मी प्रवेश करणार आणि तुम्हाला सांगून करणार, असे काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे. मी सुजयच्या विजयानंतर गिरीश महाजनांचे आभार मानायला आलो असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजप प्रवेशाच्या चर्चेला ऊत आल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज गिरीश महाजन यांची भेट घेतली. गिरीश महाजन यांच्या शासकीय निवासस्थानी विखे पाटलांनी भेट घेतली. यावेळी विखे पाटील यांनी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन लवकरच निर्णय घेईन. माझ्यासोबत कोण येईल हे प्रवेशावेळी कळेल, असेही ते म्हणाले.

दरम्यान विखे पाटील यांची सदिच्छा भेट होती. मात्र ते भाजपामध्ये येतील याबाबत त्यांनीच सांगितलंय, असे या भेटीनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असेही ते म्हणाले.

काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसचे चार आमदार, अनेक जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवकांसह जूनच्या पहिल्या आठवड्यात भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली होती.

मराठवाड्यातून एक आमदार, पश्चिम महाराष्ट्रातून एक आमदार, मुंबईतून एक आमदार असे चार आमदार राधाकृष्ण विखे पाटलांसोबत आहेत. विखे पाटील जूनच्या पहिल्या आठवड्यात भाजपात प्रवेश करतील, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. कालिदास कोळबंकर, जयकुमार गोरे, अब्दुल सत्तार हे आमदार विखे पाटलांसोबत भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. आणखी दोन आमदार देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांची नावं अद्याप समजू शकलेली नाहीत.

तीन दिवसांपूर्वी काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपात जाण्याचे संकेत दिले होते. राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून लवकरच मंत्रीपद दिले जाणार असल्याचे सत्तार यांनी सांगितले होते. तसेच राधाकृष्ण विखे पाटील जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आपण राहणार असल्याची भूमिकाही अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केली होती.