Rohit Arya Dies Mumbai Hostage Case : मुंबईतील पवई परिसरात आर. ए. स्टुडिओमध्ये 20 मुलांना ओलीस ठेवणारा आरोपी रोहित आर्या पोलिस चकमकीत ठार झाला आहे. सर्व मुले सुरक्षितपणे वाचवण्यात आली आहेत. पोलिसांनी मुलांना एकामागून एक सुरक्षितपणे इमारतीतून खाली आणले. माहितीनुसार, गुरुवारी रोहित आर्याने स्टुडिओमध्ये ऑडिशनसाठी आलेल्या सुमारे 100 मुलांपैकी 20 मुलांना आतमध्येच ओलीस बनवले होते. त्यानंतर त्याने एक व्हिडिओ प्रसिद्ध करून या घटनेची माहिती दिली. हा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागल्यानंतर खळबळ उडाली. तातडीने पोलिसांनी बचाव मोहीम हाती घेतली आणि अखेर सर्व मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले.
“मी दहशतवादी नाही..." व्हिडिओतून दिलं स्पष्टीकरण
पण, या घटनेपूर्वी रोहित आर्यने एक व्हिडिओ जारी केला होता. त्यात त्याने सांगितलं की, तो दहशतवादी नाही, तर काही प्रश्नांची उत्तरं मागत आहे. त्याने असंही म्हटलं की तो एकटा नाही, त्याच्या सोबत आणखी लोक आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, युट्युबर असलेल्या रोहितने सकाळी सुमारे मुलांना ‘अॅक्टिंग वर्कशॉप’च्या नावाखाली स्टुडिओत बोलावलं होतं. काही वेळानंतर त्याने सुमारे 80 मुलांना सोडून दिलं, मात्र उरलेल्या मुलांना आतच थांबवलं. बराच वेळ मुलं बाहेर न आल्याने पालकांनी पोलिसांना कळवलं. पावणे दोन वाजताच्या सुमारास पोलिसांना कॉल आला, ज्यामध्ये माहिती दिली की एका व्यक्तीने महावीर क्लासिक नावाची बिल्डिंग आहे तिथे लहान मुलांना बंधक बनवून ठेवलं आहे.
मुंबईतील आर. ए. स्टुडिओमध्ये नेमकं काय घडलं?
पोलिसांनी तात्काळ कॉलला प्रतिसाद देऊन इथे स्पेशल युनिट्स फोर्स बोलवली. त्यानंतर पवई पोलिस अधिकाऱ्यांनी बाथरुममधून एन्ट्री करुन आतील एका व्यक्तीच्या सहाय्याने सर्व मुलांची सुखरुप सुटका केली. एकूण 17 मुलं, 1 वयस्कर आणि एक स्थानिक असे 19 लोक आतमध्ये होते. पोलिसांनी सांगितलं की, रोहित आर्यला अटक करताना त्याच्याकडून एक एअर गन आणि काही संशयास्पद रासायनिक पदार्थ जप्त करण्यात आले. तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांच्या प्रत्युत्तरात त्याला छातीत गोळी लागली. या घटनेनं मुंबईसह राज्यभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पवई पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी किडनॅपर रोहित आर्यला गोळी मारली.
पालकांमध्ये दहशतीचं वातावरण
या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत, रोहितसोबत आणखी कोणी या कटात सामील होतं का, याचा शोध घेतला जात आहे. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात घडलेल्या या घटनेनंतर पालक वर्गामध्ये मोठी दहशत आणि चिंता पसरली आहे.
Powai Hostage Crisis: मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा मृत्यू, संपूर्ण बातमी