मुंबई : राजधानी मुंबईतील (Mumbai) पवईत एका व्यक्तीने अनेक मुलांना ओलीस ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओलीस ठेवण्यात आलेली सर्व मुले 15 वर्षांखालील असून 17 मुला-मुलींना एका खोलीत बंद करुन ठेवण्यात आले होते. या मुलांसह 2 पालकही खोलीत बंद होते. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि NSG कमांडो पोहोचले. त्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांच्या (Police) मदतीने अखेर ओलीस ठेवणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेत मुलांची सुटका करण्यात आली. यावेळी, आरोपी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली असून पोलिसांच्या चकमकीत आरोपी रोहित आर्यचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 

Continues below advertisement

मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर झाला असून आरोपीने पोलिसांवर गोळी झाडल्यानंतर पोलिसांनीही जशास तसं प्रत्युत्तर दिलं. त्यावेळी, आरोपीच्या छातीत गोळी लागली होती. त्यामुळे, रोहित आर्यला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनं मुंबईसह राज्यभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पवई पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी किडनॅपर रोहित आर्यवर गोळीबार केला होता.

सध्या शाळेला दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने पालक आपल्या मुलांना वेगवेगळ्या कोर्सेसला किंवा इतर अॅक्टीव्हीसाठी गुंतवून ठेवत आहेत. त्यातच, मुंबईच्या पवई येथील RA स्टुडिओत काही शाळकरी मुले गेल्या 4-5 दिवसांपासून प्रशिक्षणसाठी येत होती. मात्र, ऑडिशनच्या नावाखाली येथील स्टुडिओत किडनॅपरने शाळकरी मुलांना डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली. या घटनेनं मुलांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. ऑडिशनसाठी आलेल्या मुलांना दुपारी 2 वाजताच्या सुमारास जेवणासाठी सोडण्यात आल्यानंतर रोहित आर्य या व्यक्तीने मुलांना एका खोलीत कोंडून ओलीस ठेवले. 

Continues below advertisement

रोहित आर्यचा व्हिडिओतून संवाद (Rohit arya video)

रोहित आर्य (Rohit Arya) असं मुलांना ओलीस ठेवलेल्या आरोपीचं नाव असून माझ्या काही मागण्या आहेत. मी आत्महत्या करण्याऐवजी या मुलांना बंदी बनवलं आहे, असं रोहित आर्यने व्हिडिओच्या माध्यमातून म्हटलं आहे. मी दहशतवादी नाही, माझ्या काही साध्या मागण्या आहेत. मला संवाद साधायचा आहे, काही बोलायचं आहे, मला काही लोकांशी बोलायचं आहे, त्यांना प्रश्न विचारायचे आहेत असं रोहित आर्यने म्हटलं आहे.  

कोण आहे रोहित आर्य (Rohit arya education project loss)

मी दहशतवादी नाही. माझी पैशाची मागणी केलेली नाही. अनेक प्रयत्न झाले. अनेकांना अनेकवेळा भेटून झाले. 1 मे पासून साधे उपोषण करून देखील अजून आज/उद्या असेच होत आहे. त्यामुळे, आजपासून मी तीव्र उपोषण सुरु केले. आता, पाणी सुद्धा घेणार नाही. गांभीर्य समजून घेतले तर बरे होईल, नाही समजले तर जय श्री राम असं  रोहित आर्यने (Rohit Arya)  म्हटलं. मी एकटा नाही, अनेक लोकांना हा प्रश्न आहे, त्याच सोल्युशनसाठी मला संवाद साधायचा आहे, असंही ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यने म्हटलं. दरम्यान, एका प्रकल्पात आर्थिक नुकसान झाल्यामुळे रोहितने संबंधित विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. आर्य हा मागील काही दिवसांपूर्वी उपोषणाला बसला होता, त्याचे पैसे सरकारकडे आहेत. शिक्षण विभागासाठी त्याने स्वच्छता मॉनिटरचा एक प्रोजेक्ट लोन काढून केला होता, त्याचे पैसे त्याला मिळाले नाहीत आणि कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं त्याचं म्हणणं आहे. 

पोलीस आतमध्ये कसं घुसले  (Police told about powai kidapping)

पावणे दोन वाजताच्या सुमारास पोलिसांना कॉल आला, ज्यामध्ये माहिती दिली की एका व्यक्तीने महावीर क्लासिक नावाची बिल्डिंग आहे तिथे लहान मुलांना बंधक बनवून ठेवलं आहे. पोलिसांनी तात्काळ कॉलला प्रतिसाद देऊन इथे स्पेशल युनिट्स आणि क्विक अॅक्शन फोर्स बोलवली. ज्या व्यक्तीने बंधक बनवलं होतं, त्याच्याशी संवाद आणि वाटाघाटी पोलिसांनी केल्या. त्यानंतर आमच्या पवई पोलिस अधिकाऱ्यांनी बाथरुममधून एन्ट्री करुन आतील एका व्यक्तीच्या सहाय्याने सर्व मुलांची सुखरुप सुटका केली. एकूण 17 मुलं, एक वयस्कर आणि एक स्थानिक असे 19 लोक आतमध्ये होते. रोहित आर्य असं आरोपीचं नाव आहे. रोहितकडे एक बंदूक होती, पण अधिक तपास सुरु आहे. आरोपीचं बॅकग्राऊंड किंवा त्याच्या मागण्या काय होत्या याचा तपास सुरु आहे. एका वेब सीरिज ऑडिशन घ्यायचं म्हणून या मुलांना बोलवण्यात आलं होतं. त्यासाठी या सोसायटीचा हॉल घेतला होता. जी मुलं ऑडिशनसाठी आली होती, त्यांनाच त्याने बंधक बनवलं, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आतमध्ये नेमके किती लोक होते, प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं? (Powai kidnappig witness story)

साधारण 20 मुलांना बंधक बनवलं गेलं होतं. रोहित आर्या नावाचा व्यक्तीने बंदूक घेऊन सर्वांना बंधक बनवला होता. पवई पोलीस आणि डीसीपींनी  तात्काळ ऑपरेशन राबवत सर्वांना रेस्क्यू केला आहे. सकाळी शूटिंग करण्यासाठी 25 ते 30 मुलं वेगवेगळ्या जिल्ह्यामधून या ठिकाणी आले होते. शूटिंग झाली यानंतर दुपारी या सर्व मुलांना बंदूकचा धाक दाखवून किडनॅप केला गेला. किडनॅपर मुलांना किडनॅप करून मागणी करत होता. पोलिसांनी वेळेत सर्व मुलांना रेस्क्यू केला आहे. किडनॅपर बंदूक घेऊन आतमध्ये बसला होता. बंदूक घेऊन कसा आतमध्ये पोहोचला, यामध्ये सुरक्षा मोठी चूक झाली आहे. त्यामुळे कठोर कारवाई करावी असे मागणी प्रत्यक्षदर्शी यांनी केली आहे.

मुलांची सुटका, पोलीस स्टेशलना स्टेटमेंट नोंद (Mumbai powai kidnapping case)

दरम्यान, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून आरोपी माथेफिरू रोहित आर्यला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची चौकशी सूरू आहे. मात्र, या घटनेनं राजधानी मुंबईत चांगलीच खळबळ उडाली होती. सुदैवाने सर्व मुले सुखरुप आहेत, पण ते घाबरलेले आहेत असे पालकांकडून सांगण्यात येत आहे. रोहितने ओलीस ठेवलेल्या मुलांची सुटका केल्यानंतर मुलांना आणि त्यांच्या पालकांना स्कूल बसमधून पवई पोलीस स्टेशनला नेण्यात आले आहेत. पोलीस स्टेशनमध्ये मुलांसह पालकांचे स्टेटमेंट घेतलं जाईल आणि त्यानंतर त्यांना सोडतील, अशी माहिती आहे. 

किडनॅप प्रकरणात दोघे जखमी (Women injured powai kidnap case)

पवई स्टुडिओमध्ये 17 मुलांना किडनॅप प्रकरणात दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून करण्यात आलेल्या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान एक सिनिअर सिटीझन महिला आणि लहान मुलगी जखमी झाली आहे. जखमीना जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार शिवाजी सावंत यांनी महिलेला सुखरूप वाचवल्याची माहिती संबंधित महिलेकडून देण्यात आली.

रोहित आर्याचा एन्काऊंटर, पोलिसांच्या गोळीने मृत्यू (Rohit arya encounter)

पवई स्टुडिओ ऑडिशन किडनॅपिंग केस प्रकरणातील आरोपी रोहित आर्य याने छर्ऱ्याच्या बंदुकीतून पोलिसांवर गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांनी क्रॉस फायरिंग करत एक राउंडही फायर केला होता. या गोळीबारात आरोपी रोहित आर्या जखमी झाला, उपचारादरम्यान आरोपी रोहितचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान, पवई पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी किडनॅपर रोहित आर्यवर गोळीबार केला होता.

रोहितने खिडक्यांना बसवले सेन्सर, ज्वलनशील पदार्थ स्प्रे केला

मुलांना बंदी बनवणारा रोहित आर्य पूर्ण तयारीत होता. खिडकीच्या वाटे कोणी आत प्रवेश करू नये म्हणून त्याने मुलांना ओलीस ठेवलेल्या सगळ्या खिडक्यांना सेन्सर लावल्याची माहिती आता समोर आली आहे. अखेर पोलिसांनी रोहित आर्यसोबत चर्चा करत बाथरूमच्या खिडकीतून प्रवेश केला होता. यादरम्यान, आरोपी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. रोहित आर्य घातपाताच्या तयारीत होता, त्याने संपूर्ण हॉलमध्ये ज्वलनशील पदार्थ स्प्रे करून ठेवल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. कोणी आत प्रवेश केल्यास किंवा तशी कुणकुण लागल्यास संपूर्ण हॉल पेटवून देण्याचा त्याचा कट होता. मात्र, वेळीच पोलिसांनी रोहित आर्यला एनकाऊंटरमध्ये उडवल्याने मोठा अनर्थ टाळल्याचे सांगण्यात येत आहे. 

रोहित आर्यचे शिक्षण विभागाकडे अडकले होते 45 लाख (Rohit arya agitation education department)

शालेय शिक्षण विभागाने राबवलेली स्वच्छता मॉनिटर संकल्पना गुंडाळल्यानंतर ज्याची संकल्पना होती, ज्यांनी हे कंत्राट घेतलं त्या रोहित आर्याचे 45 लाख रुपये शालेय शिक्षण विभागाने बुडवल्याचा आरोप रोहित आर्यने केला आहे. तत्काली शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यकाळात स्वच्छता मॉनिटर ही संकल्पना राबवण्यात आली होती. त्यामध्ये समाजात होणाऱ्या गैरप्रकारावर विद्यार्थ्यांनी व्यक्त व्हावं, अशा प्रकारची सवय या संकल्पनेतून लागावी यासाठी हे अभियान राबवण्यात आले.  मात्र, एक वर्ष हे अभियान सुरु राहिले, त्यानंतर ते गुंडाळण्यात आले. पण, त्यासाठी 2 कोटींचे कॉन्ट्रॅक्ट रोहित आर्यला देण्यात आलं होतं, आणि त्यातील 45 लाख रुपये अजूनही शालेय शिक्षण विभागाने दिले नाहीत, असा त्याचा आरोप होता. त्यामुळेच, 1 मे पासून रोहित आर्या आझाद मैदानावर आंदोलनाला बसला आहे. त्यानंतर त्याने शिक्षण विभागाच्या विविध अधिकाऱ्यांची, मंत्र्यांची भेट घेतली. मात्र, काहीच फायदा झाला नाही. त्यातूनच, गेल्या काही दिवसांपासून रोहित मानसिक तणावात होता आणि ट्रीटमेंट सुद्धा घेत असल्याची माहिती आता समोर आली आहे.

पोलिसांनी रोहित आर्यच्या घराचा घेतला ताबा

रोहित आर्य हा मुंबईतील चेम्बूर परिसरात असलेल्या अन्नपूर्णा इमारतीच्या 9 व्या मजल्यावर राहत होता. रोहितच्या कुठल्यातरी नातेवाईकाची ही रुम आहे, जो नातेवाईक गेल्या 4 वर्षांपासून अमेरिकेत राहत आहे. आज सकाळी 9 वाजता रोहित याच इमारतीमधून बाहेर पडला होता. सध्या पोलीस या इमारतीत असून रोहित आर्यच्या रुमचा ताबा घेण्यात येत आहे. 

रोहित आर्यचं पुण्यातील कोथरुडमध्ये घर

रोहित आर्या पुण्याच्या कोथरुड भागातील शिवतीर्थ नगरमधील स्वरांजली सोसायटीत कुटुंबासह रहाण्यास होता. हे घर त्याच्या वडिलांच्या नावावर आहे. वडील हरोलीकर नाव लावतात तर रोहित आर्या हे आडनाव वापरायचा. सध्या हे घर बंद आहे. रोहितने मागील वर्षी सरकारने थकवलेले पैसे मिळावेत म्हणून सलग काही दिवस आंदोलन केलं होतं. त्यावेळी चक्कर येऊन पडल्यावर रोहितला सुरज लोखंडे यांनी मदत केली. अॅम्ब्युलंस मागवून वैद्यकीय मदत देऊ केली होती. त्यानंतर रोहित आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी सुरज लोखंडेंना घरी बोलावून त्यांचे आभार मानले होते. तसेच, त्यांच्यावर ओढवलेली परिस्थिती देखील सांगितली होती.

मुंबई क्राईम ब्रांच करणार तपास

रोहित आर्यकडून करण्यात आलेल्या 17 मुलांच्या अपहरणाचा आणि त्याच्या मृत्यूप्रकरणाचा तपास मुंबई क्राईम ब्रांच करणार आहे. त्यासाठी, मुंबई क्राईम ब्रांचची टीम मुंबईतील हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटलमध्ये दाखल झाली आहे. मृत रोहित आर्यचे पार्थिव याच रुग्णालयात आहे.

शाळकरी मुलांना रुग्णालयातून डिस्चार्ज, काही कोल्हापूर, नांदेडचे

रोहित आर्यने बंदी बनवून ठेवलेल्या 17 मुलांना मुंबईतील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आता, या मुलांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यावेळी भाजप नेते मुरजी पटेल यांनी चिमुकल्यांची भेट घेतली. मी त्या मुलांशी भेटलो, त्यांच्या पालकांशी भेटलो ते थोडे घाबरलेले आहेत. मात्र, आता ते रिलॅक्स झाले आहेत. या मुलांपैकी काही नांदेडहून आहेत, काही कोल्हापूर आणि राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून 16 जण ऑडिशनसाठी इथे आहेत, त्यांना आपण मेडिकल झाल्यानंतर इथून सोडलं आहे, असे मुरजी पटेल यांनी सांगितले. 

दोन दिवसांत अहवाल, शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली माहिती

रोहीत आर्या यांच्या संदर्भात सविस्तर अहवाल विभागाकडून मागविण्यात आला आहे. उद्यापर्यंत सविस्तर माहिती देण्यात येईल. प्राथमिक तपासानुसार, अप्सरा एंटरटेनमेंट नेटवर्क संस्थेमार्फत “स्वच्छता मॉनिटर” हा उपक्रम राबविण्याबाबत 14 सप्टेंबर 2022 रोजी शासनाला पहिले निवेदन प्राप्त झाले होते. शासनाच्या प्रकल्पांसाठी मान्यता, खर्च, कार्यपद्धती, निविदा आणि अटी-शर्ती आवश्यक असतात. पण, या प्रकरणात अशी कोणतीही कार्यपद्धती राबविल्याचे दिसत नाही. अप्सरा मिडीया एंटरटेनमेंट नेटवर्कने शाळांकडून रक्कम जमा केल्याचे आढळून आले आहे. जे शासनाच्या नियमांनुसार मान्य नाही. सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील माहिती देण्यात येईल, असे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

रोहित आर्य प्रकरणी राज्य शासनाचं स्पष्टीकरण

१) अफसरा मिडिया एंटरटेनमेंट नेटवर्क्स यांना शालेय शिक्षण विभाग किंवा शासनामार्फत कोणतीही मान्यता प्राप्त झालेली नाही.

२) अफसरा मिडिया एंटरटेनमेंट नेटवर्क्स यांच्याकडून स्वच्छता मॉनिटर या उपक्रमांतर्गत काही शाळांना पैसे देण्यात आले किंवा शासन निधीचा वापर करण्यात आला, असा कोणताही पुरावा उपलब्ध नाही.

३) या घटनेचा कोणत्याही प्रकारे शासन किंवा शालेय शिक्षण विभागाशी संबंध नाही.

४) अफसरा मिडिया एंटरटेनमेंट नेटवर्क्स संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात आलेला स्वच्छता मॉनिटर २०२३-२४ हा उपक्रम शासनाने संमती न देता केवळ सामाजिक संस्थेच्या स्वरूपात राबविण्यात आला होता. त्यामुळे सदर प्रकरणी रोहित आर्या यांच्या संदर्भातील कोणतीही माहिती शासनाशी संबंधित किंवा त्यांच्या कार्यांशी निगडित नाही. दरम्यान, महाराष्ट्र शासनाचे उपसचिव विपुल महाजन यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे. 

गृहराज्यमंत्री योगेश कदम काय म्हणाले

पवई शाळकरी मुले ओलीस प्रकरणात चौकशी सुरू आहे, चौकशी पूर्ण झाल्यावर त्याची माहिती तुम्हाला देऊ. 10 ते बारा वर्षांची 17 लहान मुलं डांबून ठेवली होती. एकाला देखील दुखापत होऊ न देता पोलिसांनी सर्वांना सुखरूप बाहेर काढलं आहे. रोहित आर्यने त्या ठिकाणी जे काही कार्य केलं, त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांना फायरिंग करावी लागली, असे राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटले.

भाजप अध्यक्षांकडून पोलिसांचे अभिनंदन

मुंबई पोलिसांचे अभिनंदन, पोलिसांनी मुलांना रेस्कू केलं आहे. गुन्हा घडायच्या आधीच पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. त्यामुळे, वेळीच मोठा अनर्थ टळला, पोलिसांनी जागृकता दाखवल्याने मोठा गुन्हा टळला, असे मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी पवई किडनॅप प्रकरणावर बोलताना म्हटले. तसेच, सोसायटीने आपला हॉल देताना नोंद ठेवली पाहिजे, पालकांनी देखील भ्रमीत करणाऱ्या जाहिरातींना बळी पडू नये आणि जागृकता दाखवणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सूचवले.