मुंबई : आर्यन खान ड्रग्ज पार्टी (Aryan Khan) प्रकरणी रोज नवनवे खुलासे होत आहे. या प्रकरणात रोज नवीन पात्रं लोकांसमोर येत आहेत. प्रत्येकजण एकमेकांवर ड्रग्ज प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप करतोय. पण या सर्वांच्या बोलण्यातून एक समान गोष्ट समोर येतेय ती म्हणजे अहमदाबाद, गुजरात. नुकतंच  सुनिल पाटील यांनी मनीष भानुशाली यांचे गुजरातच्या मंत्र्यासोबत जवळचे संबंध असल्याचं सागितलं आणि हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. 


आर्यन खान ड्रग्ज प्रकरण किंवा मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण हे जरी मुंबईत घडलं असलं तरी याची सूत्रं नेमकी कोणत्या ठिकाणाहून हलवली जात आहेत हे अद्याप समजायला मार्ग नाही. एनसीबीने 2 ऑक्टोबरला कॉर्डेलिया जहाजावर छापा मारला आणि आर्यन खान तसेच इतर काहीजणांना ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक केली. गेल्या महिनाभरात या प्रकरणात बरंच पाणी वाहून गेलं असून आता एनसीबीचे मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंनाच आरोपीच्या कठड्यात उभं केलं जात आहे. 


मनीष भानुशालीचे गुजरातच्या मंत्र्यासोबत जवळचे संबंध
आतापर्यंत या प्रकरणात मनीष भानुशाली, किरण गोसावी, सॅम डिसुझा, प्रभाकर साईल, विजय पगारे आणि सुनिल पाटील अशी एकेक नावं समोर आली आहेत. या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत असलेल्या सुनिल पाटलांनी आता आपली बाजू मांडली आहे. मनीष भानुशालीचे गुजरातच्या मंत्र्यासोबत जवळचे संबंध असल्याचं त्यांनी सांगितलं. 


सुनिल पाटील, किरण गोसावी आणि मनीष भानुशालीची अहमदाबादमध्ये भेट
सुनिल पाटील म्हणाले की, "किरण गोसावी याला आपण 22 सप्टेंबरला पहिल्यांदा भेटलो. 27 तारखेला मनीष भानुशाली यांच्यासोबत मी अहमदाबादला गेलो. ड्रग्ज प्रकरणी मला टीप मिळाली नव्हती तर ती मनीष भानुशालीला मिळाली होती. निरज यादव हा मध्य प्रदेशमधील भाजपचा कार्यकर्ता असून त्याने या प्रकरणी आपल्याशी संबंध साधला होता. सॅम डिसुझाला चार महिन्यापूर्वी एका ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने समन्स पाठवलं होतं. त्यावेळी त्याने एनसीबीच्या अधिकाऱ्यांना 25 लाख रुपये देणार असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर तो या प्रकरणातून सुटला."


आर्यन खानला पकडण्याचा डाव अहमदाबादमध्ये शिजला का? 
या प्रकरणातील आणखी एक साक्षीदार विजय पगारे याने सांगितलं की, 27 सप्टेंबरला सुनिल पाटील, किरण गोसावी आणि मनीष भानुशाली हे तिघे अहमदाबादमध्ये भेटले. आता या प्रकरणात किरण गोसावी आणि मनीष भानुशालीची भूमिका स्पष्ट झाली आहे. या दोघांनीच एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या सोबतीने आर्यन खानला पकडले आणि एनसीबीच्या ऑफिसमध्ये आणले.


हे प्रकरण घडायच्या आगोदर पाच-सहा दिवस किरण गोसावी आणि मनीष भानुशाली हे गुजरातच्या अहमदाबादमध्ये होते हे स्पष्ट झालंय. त्यावेळी सुनिल पाटील हेही त्या ठिकाणी होते. हे प्रकरण घडलं त्यावेळी आपण अहमदाबादमध्ये होतो, आणि आपल्याला मध्यस्ती करण्यासाठी सुनिल पाटील यांचा कॉल आला होता असं सॅम डिसुझानेही सांगितलं आहे.


प्रभाकर साईलने किरण गोसावीवर आरोप करत त्यानेच 25 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला होता. सॅम डिसुझाने किरण गोसावी हा फ्रॉड असून त्यानेच हे प्रकरण घडवले असल्याचा आरोप केला होता. सुनिल पाटील म्हणतात की त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही. चार-पाच दिवसांपूर्वी ते गांधीनगरमध्ये असताना त्यांना दिल्लीत बोलवण्यात आलं होतं असं त्यांनी सांगितलं. मनीष भानुशाली हा भाजपचा सक्रिय कार्यकर्ता असून त्याचे गुजरातच्या नेत्यांसोबत चांगले संबंध असल्याचं स्पष्ट झालंय.  


मुंबईला बदनाम करण्याचा डाव? 
या प्रकरणात सुरुवातीला शिवसेना खासदार संजय राऊत आणि आता राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी थेट भाजप आणि एनसीबीवर आरोप केले आहेत. हे सर्व प्रकरण म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाचा मास्टरमाईंड नेमका कोण आहे हे अद्याप समोर आलं नाही. पण यामध्ये आतापर्यंत ज्या लोकांची नावं समोर आली आहेत त्या सर्वांचे काही ना काही गुजरात कनेक्शन नक्की आहे असंच दिसतंय. 


 



महत्वाच्या बातम्या :